पुणे : धूळ, धूर, दिवाळी खरेदीसाठी उडालेली नागरिकांची झुंबड, यानिमित्ताने रस्त्यांवर येणारी हजारो वाहने यामुळे पुण्यात हवेचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्दी, पडसे, दमा, डोळे चुरचुरणे आणि दोन ते तीन आठवडे चालणा-या खोकल्याने बेजार केले आहे. तसेच वाढलेली थंडी आणि आर्द्रता यामुळे पुण्यासह उपनगरांतील हवेचा दर्जा खालावला आहे.
सध्या शहरातील हवेचे प्रदूषण वाढले आहे. यामध्ये धूळ, धूर यांचा समावेश आहे. तसेच आता वाहने मोठ्या प्रमाणात बाहेर काढल्याने हवेत पीएम १० आणि पीएम २.५ या सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने पुणेकरांचा दम घुटत आहे. मानवी केस सुमारे १०० मायक्रोमीटर रुंद असतात. त्यामुळे त्याच्या रुंदीवर अंदाजे ४० सूक्ष्म कण बसू शकतात.
पीएम २.५ हा धूलीकण २.५ मायक्रोमीटर व्यासाचा किंवा त्याहून लहान असतो.
तो मानसाच्या केसांच्या व्यासाच्या तुलनेत ३ टक्के इतक्या लहान आकाराचा असतो. ते केवळ सूक्ष्म दर्शकाखाली शोधता येतात. हे घटक सर्व प्रकारचे ज्वलन, दिवाळी दरम्यान फटाके, कचरा जाळणे, मोटार वाहने, पॉवर प्लांट, लाकूड जाळणे, जंगलातील आग, शेती जाळणे आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून तयार होते. हे सूक्ष्म धूलीकण श्वसन मार्गाद्वारे फुप्फुसांमध्ये जातात. फुफ्फुसे ते काढून टाकू शकत नाहीत. तसेच त्यांना शरीर अडथळा करू शकत नाही. इतकेच नव्हे, तर श्वास घेतल्यावर आपल्या फुफ्फुसांद्वारे रक्तप्रवाहात हे कण नेले जातात आणि पुढे रक्तापासून आपल्या शरीराच्या काही भागांमध्ये, अवयवांमध्ये जातात.