छ. संभाजीनगर : शेतातील पाणीसाठ्यावर रबी हंगामातील पिके जोपासली जातात. मात्र, यंदा पेरणीच्या वेळीच जमिनीत ओल नसल्याने भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार, हे निश्चित होते. मात्र, आशादायी शेतक-यांनी पेरणी केली. आता पिकांची उगवण झाली असताना विहीर, बोअरलने तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहेत. प्रकल्पातून पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पिके कशी जोपासली जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, यंदा राज्यात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. काही जिल्हे सोडता बहुतांश भाग हा दुष्काळाच्या गर्देत सापडला आहे. मराठवाड्यातील बहुतांश शेतीवर रबी पिकांमध्ये हरभरा, गव्हाची पेरणी झाली आहे. पिकेही उगवली आहेत. मात्र, पाण्याअभावी पिके मान टाकत आहेत. शासन दरबारी रबी पेरणीच्या टक्केवारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी, प्रत्यक्ष बांधावरची स्थिती ही वेगळीच आहे. जमिनीतील ओल उडून जाईल, या भीतीने खरीप पिकांची काढणी होताच मशागत न करता शेतक-यांनी चाड्यावर मूठ धरली होती.
पेरले ते उगवतेच, पण उगवलेल्या या पिकातून उत्पादन पदरी पडणार की नाही, अशी स्थिती आहे. पाण्याअभावी उगवण होताच पिकांनी माना टाकल्या आहेत. हंगामी नाही किमान अवकाळी पाऊस तरी तारेल, या आशेवर शेतक-यांनी पेरणी केली मात्र प्रतिकूल वातावरणामुळे रबीची आशा धुसर झाली आहे.
हरभरा आणि ज्वारी वाया जाण्याच्या मार्गावर
बहुतांश जिल्ह्यात विहीर आणि बोर यांनी देखील तळ गाठला आहे. सर्वच प्रकल्पात पाणीसाठा अत्यल्प आहे. शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. आता पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी रबीची पिकंही जाण्याची भीती आता स्पष्ट आहे.
जनावरांच्या चा-याचाही प्रश्न निर्माण
खरिपात पावसाने दगा दिला. रबीत ही तिच परिस्थिती आहे. निदान चा-यापुरते काहीतरी हाती लागेल अशी आशा होती. ती देखील आता धूसर होत आहे. पिकांना पाणी नाही. प्यायला पाणी नसण्याची स्थिती निर्माण होत आहे. जनावरांनाही चारा उपलब्ध होण्याची स्थिती सध्या नाही.