21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रप्रशांत बंब यांच्या सभेत राडा

प्रशांत बंब यांच्या सभेत राडा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सभेत दोन तरुणांनी बंब यांना तुम्ही १५ वर्षे आमदार होतात, तर तुम्ही काय काम केलं? असा प्रश्न विचारला असता यावरून सभेत गोंधळ झाला. तर विरोधक मुद्दामून असे काही लोक पाठवून सभेत वारंवार गोंधळ घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत बंब यांचा प्रचार सुरू आहे. प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे गेल्या १५ वर्षांपासून आमदार आहेत. दरम्यान, प्रशांत बंब यांची गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये कॉर्नर सभा सुरू असताना काही तरुणांनी त्यांना प्रश्न विचारला.

तुम्ही १५ वर्षे या मतदारसंघाचे आमदार होतात. तुम्ही काय काम केलं? असा प्रश्न त्यांनी बंब यांना भर सभेत विचारला. अनपेक्षित प्रश्नामुळे प्रशांत बंब यांनी त्यावर उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘मी आमदार नसलो तर तू मरेपर्यंत पस्तावशील. मी आमदार नसलो तर हे लोकं हालत खराब करतील तुमची. इथे लोक शांत बसलेले आहेत. तू मुद्दाम इथे दादागिरी करत आहेस आणि यांना बाहेर काढ असे म्हणत बंब यांचे कार्यकर्ते त्या तरुणावर तुटून पडले.

रेल्वे आणू असं तुम्ही म्हटलं होतं, त्याचं काय झालं? असा प्रश्न तरुणाने विचारला असता यावरून सभेत गोंधळ झाला. यावर बंब यांनी उत्तर दिलं, मात्र तरीही तरुण ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने सभेला उपस्थित नागरिक आणि तरुण यांच्यामध्ये वाद आणि धक्काबुक्की झाली. काही काळानंतर वातावरण शांत झालं. यावेळी प्रशांत बंब यांना प्रश्न विचारला असता, विरोधक मुद्दामून असे काही लोक गेल्या काही दिवसांपासून पाठवत आहेत. सभेत वारंवार गोंधळ घालून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रशांत बंब म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR