मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे. त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरुन सत्ताधा-यांवर निशाणा साधलाय. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
‘इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे’’, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
‘‘तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे, असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू’’, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
‘‘ यासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला’’, असं राज ठाकरे म्हणाले.