सिंधुदुर्ग : राजकारणात कोण केव्हा कोणत्या पक्षात जाईल, कोण कोणासोबत आपल्या फायद्यासाठी कधी कसा जुळवून घेईल याचा नेम नाही. असाच काहीसा प्रत्यय सिंधुदुर्गच्या राजकारणात आला.
कोकणातल्या राजकीय वै-यांची दिलजमाई झाली आहे. एकेकाळी एकमेकांचे कट्टर वैरी असलेले नेते आता हमसफर झाले आहेत. दोघांनी एकाच गाडीतून एकत्र प्रवास केला आहे.
आम्ही कुणाबद्दल बोलत आहोत याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. हो.. बरोबर ओळखलंत… नारायण राणे आणि दीपक केसरकर. राणे-केसरकर यांच्यामधला वाद अवघ्या कोकणाला माहिती आहे. पण आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी काही नावं चर्चेत आल्यानंतर हे दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेच्या जागेसाठी अनेक नावं चर्चेत आहेत. यात नारायण राणे, दीपक केसरकर, किरण सामंत यांचा समावेश आहे. त्यासोबत ही जागा शिंदे गटाला दिली जाईल अशा देखील चर्चा होत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव या जागेसाठी चर्चेत आल्यानंतर प्रथमच नारायण राणे, दीपक केसरकर आणि नितेश राणे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत: गाडी थांबवत प्रसार माध्यमांना हे व्हीडीओ घेण्यास सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता गाडीत नेमक्या काय चर्चा रंगल्या असतील याबाबत तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत.
दीपक केसरकर २००९ मध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राणे आणि केसरकर यांचं सख्ख्य नव्हतं. त्यामुळे नेहमी राणेंच्या विरोधात तोफ डागणा-या दीपक केसरकरांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याचाच फटका म्हणून नारायण राणेंना २०१४ च्या विधानसभेत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दीपक केसरकरांनी सातत्याने राणेंवर टीका केली होती.