नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला २१ दिवसांची फर्लो सुटी मंजूर करण्यात आली आहे. गुरमीत राम रहीम सिंग रोहतकच्या सुनारिया तुरुंगात, हत्या आणि बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. पुढील आठवड्यात तो पुन्हा एकदा कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
गुरमीत राम रहीम सिंगची २१ महिन्यांतील ही ८वी फर्लो सुटी आहे. याआधी त्याला दोनदा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्याचा पॅरोल संपल्यानंतर त्याने फर्लोसाठी अर्ज केला होता. गुरमीत राम रहीम सिंग हा बाहेर आल्यानंतर उत्तर प्रदेशातील बागपत येथील आश्रमात राहणार आहे. या निर्णयाचे राजकीय परिणामही काढले जात आहेत.
फर्लो जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी
फर्लो रजा ही कौटुंबिक, वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी दिली जाते. एक कैदी वर्षातून तीन वेळा फर्लो घेऊ शकतो, परंतु त्याचा एकूण कालावधी ७ आठवड्यांपेक्षा जास्त नसावा. भक्कम कारणे असल्यास, १२० दिवसांसाठी फर्लो मंजूर केला जाऊ शकतो. याआधी कैद्याने तीन वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे आणि कारागृहातील त्याची वागणूक चांगली असणे आवश्यक आहे. याची मंजुरी कारागृह विभागाचे महासंचालक देतात.
पॅरोलसाठी कडक नियम
त्याचबरोबर पॅरोलसाठी कारणे देणे आवश्यक आहे. हे फक्त कारागृह अधीक्षकांच्या देखरेखीखाली दिले जाते. त्याचे नियम कडक आहेत. महाराष्ट्र कारागृह नियमावलीनुसार, कैद्याला वर्षातून जास्तीत जास्त ९० दिवस पॅरोलवर सोडता येते.