30.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा आणखी एक फोटो राऊतांनी केला ट्वीट

मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा आणखी एक फोटो राऊतांनी केला ट्वीट

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबत झालेल्या भेटीचे फोटो शेअर करण्याची मालिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून सुरूच असून, आज देखील त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा एक फोटो ट्वीट केला आहे. ‘शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा’ असे म्हणत राऊत यांनी शिंदे यांचा फोटो शेअर केला आहे.

संजय राऊत यांनी आज देखील मुख्यमंत्री शिंदे यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. ज्यात शिंदे यांच्यासोबत उभे असलेल्या दोघांच्या गळ्यात शिवसेनेचे उपरणे पाहायला मिळत आहे. यातील एकाच्या फोटोला गोल रिंगण करण्यात आल्याचे फोटोत दिसत असून, हा गुंड असल्याचा दावा राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे रोज असा एक फोटो टाकण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान याबाबत ट्वीट करत संजय राऊत यांनी म्हटले आहे की, ‘शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा.. ठाणे, पुणे परिसरात हत्या, अपहरण, सोन्या-चांदीच्या दुकानांवर दरोडे, अशा गुन्ह्यांत सहभागी असलेल्या या महाशयांचे स्वागत मुख्यमंत्री उत्साहाने करीत आहेत. पुणे आणि ठाणे पोलिस आयुक्तांनी या दाखलेबाज महात्म्याची माहिती जाहीर करावी!… गुंडांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य… असे राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणत आहेत.

पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो सुरुवातीला संजय राऊत यांनी शेअर केला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
दुस-या दिवशी पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केला. निलेश घायवळ पुण्यात गँगस्टर म्हणून ओळखा जातो. त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे यासारखे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

तिस-या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम यांचा फोटो राऊत यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे. मागील वर्षी पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकी वेळी जितेंद्र जंगमने शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हाचा हा फोटो आहे. जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न, मारामारी, खंडणी मागणे असे सात गंभीर गुन्हे नोंद असून २०२१ मध्ये त्याच्यावर त्याच्या टोळीसह मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, आज चौथ्या दिवशी देखील राऊत यांनी शिंदे यांचा गुंडासोबतचा फोटो शेअर केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR