अमरावती : अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही, असे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते.. त्यावर अजित पवार यांनी रवी राणा यांची कानउघाडणी केली असून रवी राणांना वाचाळवीर म्हणून संबोधले आहे. किंबहुना स्वत:च्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना योग्य पद्धतीने समज द्यावी, असा सल्ला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देत रवी राणांबाबत आपले परखड मत व्यक्त केले.
अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभेचे आमदार आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. यावेळी एका सभेत बोलताना रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही, असे वक्तव्य केले होते.
दरम्यान याच वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून रवी राणा यांची कानउघाडणी करण्यात आली आहे. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवी राणांना समज द्यावी, असा सल्लाही दिला आहे. तसेच रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी असल्यासारखे आहेत.
लोक काही काही बोलत असतात. आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. विधानसभेला मी पण रवी राणांचे दोनदा समर्थन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने रवी राणांना समजावून सांगितले पाहिजे, असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
गेट वेल सून.. लवकर बरे व्हा! -सुषमा अंधारे
दरम्यान, याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका करत यावर भाष्य केले आहे. रवी राणा यांना ही निवडणूक जड जात आहे. रवी राणा हे पैशांची निवडणूक लढवत आहेत. लोकसभेमध्ये नवनीत राणांना पराभूत करून गुंडशाहीला उत्तर जनतेने दिलं आहे. तसेच नवनीत राणंना भान असलं पाहिजे. त्यांना गेट वेल सून… लवकर बरे व्हा. असे म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.