22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्ररवींद्र वायकरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

रवींद्र वायकरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

मुंबई (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे रवींद्र वायकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विभागाचे आमदार आहेत. वायकर जर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत गेले तर तो उद्धव ठाकरेंसाठी आणखीन एक मोठा धक्का असणार आहे. वायकर यांच्यावर कथित घोटाळ्याचे आरोप असून त्यांची ईडी चौकशी सुरू आहे. हा एक प्रकारचा दहशतवाद आहे, रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील व जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे वायकर यांच्या भोवती गेल्या काही दिवसांपासून ईडीने चौकशीचा फास आवळला आहे. कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी वायकर यांच्या निवासस्थानी तसेच मातोश्री क्लबवर धाडी टाकल्या होत्या. आर्थिक गुन्हे शाखेकडूनही वायकर यांची चौकशी सुरू असून गुन्हे शाखेने वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि व्यावसायिक भागीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्ष प्रवेशापूर्वी वायकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतली होती. या भेटीत चर्चा होऊन वायकर यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार रवींद्र वायकर हे शुक्रवारी प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. वायकर हे मातोश्रीचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. मुंबई महापालिकेत नगरसेवक असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. वायकर हे पहिल्यांदा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी गृहनिर्माण या खात्याचे राज्यमंत्रिपद भूषविले होते.

रवींद्र वायकर यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेतील आमचे सहकारी नेते रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा, पक्षांतर करा नाही तर तुरूंगात जा, असे त्यांना धमकावले जात आहे. हा एकप्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील आणि जिंकतील, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, असे राऊत यांनी एक्स या समाज माध्यमात दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR