22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्रसंगी मंत्रिपद सोडण्याचीही तयारी : छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्रसंगी मंत्रिपद सोडण्याचीही तयारी : छगन भुजबळ

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता : मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे व मी ही तीच भूमिका मांडतो आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे. १९९२ ला मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून शिवसेना सोडली होती. तेव्हापासून आजपर्यंत आपल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. ही भूमिका कोणाला अडचणीची वाटत असेल व मुख्यमंत्री अथवा आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले तर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचीही आपली तयारी असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज स्पष्ट केले.

एका खाजगी वृत्तवाहनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे भूमिका मांडली. अंबड येथील ओबीसी महाएल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. यामुळे मराठा आणि ओबीसी असा वाद देखील निर्माण झाला आहे. महाएल्गार सभेनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, याबाबतची मागणी केली आहे. तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही भुजबळांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, आमदारकी, मंत्रिपद हे आयुष्यात सर्व काही नाही.

गेली ३५ वर्ष आमची ओबीसींसाठी लढाई आहे. मराठ्यांना आरक्षण द्या. त्याला आमचा विरोध नाही. परंतु आमचे आरक्षण टिकवा यासाठी आम्ही लढत आहोत. मी चुकीचे काहीही बोलत नाहीय. तरीही जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की छगन भुजबळांची अडचण होतेय. सरकारमध्ये सुद्धा माझ्यामुळे अडचण होतेय. तुम्ही फक्त एक मेसेज पाठवा आणि माझा राजीनामा घ्या, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या, असेच सर्व नेते म्हणतायत. मी ही तेच म्हणतोय. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, ओबीसीत आधीच ३७५ जाती आहेत, कोणाला त्यात काय मिळणार म्हणून मराठा समाजाला वेगळे असे आरक्षण द्या असे मी म्हटले. पण मलाच का टार्गेट केले जात आहे. मला रोज वेगवेगळे मेसेज येतात. मला सातत्याने शिव्या देणे चालू आहे. आमदारांची घरे जाळली. प्रकाश सोळंके, सुभाष राऊत यांची घरे जाळली. त्यांच्या घरात लेकरं-बाळं नव्हती का? पोलिसांनी का बघ्याची भूमिका घेतली. बाकी कोणी काही बोलायला तयार नाही. त्यामुळे मग मी उठलो आणि सभा घेतली, असेही भुजबळानी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR