सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. रोहिणीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. रोहिणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती निलेश पाराध्ये याच्याविरोधात मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच रोहिणीने मृत्यूला कवटाळल्याचे आता समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गेल्या २६ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास, ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये २५ वर्षीय रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या आत्महत्येभोवती मोठे गूढ निर्माण झाले होते.
मात्र, मृत रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (रा. अर्धनारी) यांनी दिलेल्या अधिकत फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांत दाखल झालेल्या एफआयआरनुसार, आरोपी पती निलेश हा रोहिणीला वारंवार टोमणे मारून मारहाण करायचा, तसेच तिला गंभीर परिणामांची धमकीही द्यायचा, असे नमूद करण्यात आले आहे. रोहिणीच्या वडिलांनी लावलेल्या या गंभीर आरोपांनंतर मंगळवेढा पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. या आत्महत्येपूर्वी त्यांच्यात नेमका काय वाद झाला होता आणि आरोपीने तिला आत्महत्येस प्रवृत्त केले का, यादृष्टीने पोलिस आता हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रोहिणीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासत आहेत.
















