उत्तर गाझा : इस्राइलसोबत सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या दरम्यान हमासने बुधवार दि. १६ नोव्हेंबर रोजी ओलिसांची सुटका केली आहे. यासोबतच सर्व ओलीस सोडण्यास तयार असल्याचे हमासने पुढे म्हटले आहे. मात्र यासाठी इस्राइलला एक अट देखील घातली आहे.
हमासचे वरिष्ठ अधिकारी आणि गाझाचे माजी आरोग्य मंत्री बासेम नइम यांनी म्हटले आहे की, जर इस्राइलने इस्लामिक चळवळीत कैद झालेल्या सर्व ७००० पॅलेस्टिनींची सुटका केली तर ते इस्रायली सैनिकांसह सर्व कैद्यांना सोडण्यास तयार आहेत. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. तर हमास इस्राइलशी शत्रुत्व संपवण्यासाठी चर्चा करत आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या सर्व कैद्यांच्या बदल्यात त्यांचे सर्व सैनिक सोडण्यास तयार आहोत, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
हमास आणि इस्राइल यांच्यातील युद्धविराम करारानुसार ६० इस्रायली ओलीस आणि १८० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धविरामानंतर गाझामध्ये पुन्हा युद्ध सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर हमासकडून हे नवे वक्तव्य समोर आले आहे.
२०११ मध्येही केली होती सुटका
अशा अटींच्या आधारे हमासने २०११ मध्ये इस्राइलमधून ११०० कैद्यांची सुटका केली आहे. त्यानंतर हमासने इस्रायली सैनिक गिलाड शालितच्या बदल्यात शेकडो पॅलेस्टिनींची सुटका केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आताही ७००० हून अधिक पॅलेस्टिनी इस्रायली तुरुंगात बंद आहेत त्यापैकी बहुतेक हमासचे सदस्य आहेत.