नवी दिल्ली : केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना बॉर्नविटाला हेल्थ ड्रिंक कॅटेगरीमधून काढून टाकण्यास सांगितले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केले असून यानुसार सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर बॉर्नविटासह सर्व पेय पदार्थांना हेल्दी ड्रिंक कॅटगरीतून बाहेर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीफिकेशननुसार राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, बाल अधिकार संरक्षण आयोग (सीपीसीआर) कायदा २००५ च्या कलम (३) अंतर्गत एक स्थापन केलेल्या संस्थेने तपास केला. या तपासात हे हेल्थ ड्रिंक्सच्या व्याख्येत बसत नसल्याचे समोर आले आहे. या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना डेयरी आधारित, धान्य किंवा माल्ट आधारित पेय पदार्थाना हेल्दी ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून लेबल न करण्याबाबत निर्देश दिले होते. यासाठी कारण देताना हेल्दी ड्रिंक शब्दाची देशाच्या अन्न कायद्यात व्याख्या करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.