मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ झालेले आंदोलन राजकीय प्रेरित होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत आंदोलकांचा पुरावा सादर करत सरकारला प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, बदलापुरात १३ ऑगस्ट रोजी एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचा-याने लैंगिक अत्याचार केले होते. या घटनेचा निषेध करत काही आंदोलकांनी ज्या शाळेत ही घटना घडली तिची तोडफोड केली. तर दुसरीकडे आंदोलकांच्या एका गटाने बदलापूर स्थानकात १० तास रेल्वेमार्ग रोखून धरला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पळवून लावले.
यावेळी नागरिकांकडून लाडकी बहीण योजनेचाही निषेध नोंदवण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन राजकीय प्रेरित होते असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आंदोलकांमध्ये बदलापूरचे लोक नव्हते तर बाहेरून गाड्या भरून लोकांना तिथे आणले गेले असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यावर आता विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकार फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचे म्हटले आहे. वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट करत आंदोलनात अटक करण्यात आलेल्यांच्या नावाची यादी पोस्ट केली आहे.
शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारचे अजून एक फेक नरेटिव्ह. बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणा-या सत्ताधा-यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळ्या आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहेत. या सरकारला फक्त स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वत: मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
रक्षाबंधनामुळे मंगळवारी झाले आंदोलन
दरम्यान, अत्याचाराच्या घटनेविरोधातील आंदोलन हे पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे आंदोलन मंगळवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावरून लोकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच आंदोलक बदलापूर स्थानकाच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली होती.