23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील ८ आमदारांचे राजीनामे

महाराष्ट्रातील ८ आमदारांचे राजीनामे

राहुल नार्वेकरांनी सभागृहात नावे वाचून दाखवली!

मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणा-या या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी शेतक-यांचे मुद्दे, मराठा विरुद्ध ओबीसी वाद, पोर्शे अपघात प्रकरण, घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना अशा अनेक मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी केली आहे. तिकडे पावसाळी अधिवेशनात सरकारकडून अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. तर २८ जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

दरम्यान, अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावे सभागृहात वाचून दाखवली. राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला.

यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह ८ आमदारांचा समावेश आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला.

राजीनामा दिलेल्या सदस्यांची माहिती
राजू पारवे – उमरेड विधानसभा (राजीनामा – २४ मार्च)
निलेश लंके – पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल)
प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा
बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून)
संदिपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून)
रवींद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा
लोकसभेवर निवड
महाराष्ट्रातील ७ आमदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. विधानसभेचे १३ आणि विधान परिषदेचे २ असे १५ आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यापैकी ७ आमदारांचा विजय झाला तर ८ आमदार पराभूत झाले.

कोणत्या आमदारांचा लोकसभेला पराभव?
१. सुधीर मुनगंटीवार (भाजप) – चंद्रपूर
२. राम सातपुते (भाजप) – सोलापूर
३. मिहिर कोटेचा (भाजप) – ईशान्य मुंबई
४. यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) – दक्षिण मुंबई
५. विकास ठाकरे (काँग्रेस) – नागपूर लोकसभा निवडणुकीत पराभव
६. रवींद्र धंगेकर (काँग्रेस) – कसबा लोकसभा निवडणुकीत पराभव
७. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट) – सातारा लोकसभा निवडणुकीत पराभव
८. महादेव जानकर (रासप) – परभणी लोकसभा निवडणुकीत पराभव

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR