मुंबई/पुणे : देशाच्या उत्तरेकडील सीमेपलीकडून येणा-या शीतलहरींचा वेग काहीसा मंदावला असून उत्तरी पर्वतीय क्षेत्रामध्येही गारठा कमी झाल्याचे लक्षात येत आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड या भागांमध्ये सध्या डोंगराळ क्षेत्र वगळता मैदानी भागामध्ये किमान तापमानाच वाढ झाली असून या राज्यांकडून येणा-या वा-यांचा वेग आणि प्रभाव मंदावल्यामुळे महाराष्ट्रापर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडे थंडीचा कडाका कमी झाल्यामुळे राज्यातही किमान आणि कमाल तापमानात मोठा फरक पाहायला मिळत आहे. तर, बंगालच्या उपसागरातील पूर्वमध्य क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागामध्ये सध्या पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून महाराष्ट्रातही त्याचा कमीजास्त परिणाम दिसून येत आहे. राज्यात धुळ्यापासून निफाडपर्यंत बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली असून बोचरी थंडी काहीशी माघार घेताना दिसत आहे. तर, विदर्भावर पावसाचे ढग घोंगावत असून इथे तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ऐन हिवाळ्यात वादळी वारा
राज्यात ऐन हिवाळ्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं आता शेतकरी चिंतेत आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा फटका शेतपिकाला बसणार आहे.
थंडीचा कडाका
पुढील ४८ तासांमध्ये राज्यात थंडीचा कडाका कमी राहणार असला तरीही आठवड्याचा शेवट मात्र गारठ्यानेच होणार आहे. दक्षिणेकडे सक्रिय असणा-या कमी दाबाच्या पट्टयामुळे वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळे महाराष्ट्राला वादली पावसाचा तडाखा बसणार असून यादरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारेही वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासमवेत मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवामानाची अशीच स्थिती कायम राहणार असून ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.