उत्तर गाझा : हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर मोठा दहशतवादी हल्ला केला. यानंतर इस्रायलने हमास विरोधात थेट युद्धाचा बिगूल वाजवला आणि गाझामध्ये जबरदस्त हवाई आणि जमिनीवरील हल्ले करायला सुरुवात केली. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या इस्रायलच्या या प्रत्युत्तरात आतापर्यंत १० हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इस्रायली ग्राउंड फोर्सेस गाझातील हमासच्या ठिकानांना लक्ष्य करत आहेत. अनेक ठिकाणी तर इस्रायली लष्कराने कब्जाही केला आहे. हमास या ठिकाणांचा वापर रॉकेट हल्ले करण्यासाठी करत होता. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हमास शाळा आणि मशिदीचा वापर रॉकेट लॉन्च सेंटर म्हणून करत होते.
यासंदर्भात इस्रायलच्या लष्कराने दोन व्हीडीओ देखील जारी केले आहेत. यातील पहिल्या व्हीडीओमध्ये इस्रायली सैनिक एका शाळेची इमारत दाखवत आहे. या शाळेच्या भिंतीवर मुलांच्या पेंंिटग देखील आहेत. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, हमाचे दहशतवादी या शाळेचा वापर इस्रायलवर हल्ला करण्यासाठी करत होते. इस्रायली लष्कराने जारी केलेल्या दुस-या व्हीडीओमध्ये, एक उद्ध्वस्त इमारत दिसत आहे. ही इमारत एका मशिदीची असून यात इस्रायलवर हल्ला करण्याच्या दृष्टीने रॉकेट लाँचर्स बसविण्यात आले असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.
गाझाचा जगाशी संपर्क तोडला
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात १० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने सोमवारी पहाटे संपूर्ण गाझा शहराला वेढा घात हमासचा वरचष्मा असलेल्या उत्तर गाझाचा तेथील अन्य ठिकाणांसोबत असलेला संपर्क तोडला आहे. इस्रायलने कोंडी केल्यामुळे गाझामध्ये इंधन, औषधी, अन्नधान्य अशा जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तेथील शाळांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अख्यत्यारीतील संघटनांनी मदत छावण्या सुरू केल्या आहेत.