मास्को : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटला असून रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक भूभागांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. सुमारे ५०० ड्रोन्सच्या साहाय्याने केलेल्या या हल्ल्यांमध्ये किमान ९ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
रशियाने प्रामुख्याने युक्रेनमधील नागरी निवासी भाग, किराणा दुकाने, पेट्रोल पंप, स्टील प्लांट्स आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, युद्धाच्या आघाडीवर अपेक्षित यश न मिळाल्याने रशियन सैन्याने आता युक्रेनची अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त करण्याची नवी रणनीती आखली आहे.
विविध नागरी शहरात नुकसान
क्रामाटोर्स्क या डोनेट्स्क प्रदेशातील रणनीतिक शहरात रशियन सैन्याने नागरिकांच्या खाजगी गाड्यांना लक्ष्य केले, ज्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. झायटोमिर भागातील झ्व्याहेल येथे एका किराणा दुकानावर आणि दोन पेट्रोल पंपांवर क्षेपणास्त्र डागण्यात आले, ज्यामध्ये २ जणांना प्राण गमवावे लागले. झापोरिजिया आणि क्रिव्हि रिह येथे रात्रभर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला असून अनेक औद्योगिक प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काळ्या समुद्राजवळील ओडेसा बंदरावर झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे ४० नागरिक जखमी झाले आहेत.
युक्रेनकडूनही प्रत्युत्तर
युक्रेनियन सैन्यानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. युक्रेनने रशियाच्या समारा प्रदेशातील तोग्लियाटी येथील सर्वात मोठ्या कृत्रिम रबर उत्पादक कारखान्यावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे कारखान्यात मोठी आग लागली. हा कारखाना रशियन क्षेपणास्त्रांच्या इंधनासाठी आवश्यक घटक तयार करतो. या वाढत्या लष्करी तणावामुळे आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या मोल्दोव्हा देशाने आपले हवाई क्षेत्र काही काळासाठी बंद केले होते. दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या या भीषण हल्ल्यांमुळे संपूर्ण पूर्व युरोपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
















