निप्रो : युक्रेनच्या निप्रो शहरात रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या दोन ट्रेनवर रशियाने ड्रोनहल्ला केला. या हल्ल्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रशियाने जेट इंजिनच्या ड्रोनने हे हल्ले केल्याचे उघड झाले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडीमीर झेलेन्स्की यांनी एक्सवर पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. रशियाने केलेला हा भ्याड हल्ला आहे असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हा हल्ला झाला त्यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक लोकल इलेक्ट्रिक ट्रेन आणि एक पॅसेंजर ट्रेन उभी होती. झेलेन्स्कीनी या हल्ल्याची कठोर शब्दांत निंदा केली आहे. तसेच रशियाविरोधात कठोर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी युरोपीय संघ, अमेरिका आणि जी-७ कडे विनंती केली आहे की, जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत रशिया आणि त्यांच्या लष्करावर दबाव आणायला हवा, असे झेलेन्स्की यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
















