नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१० फेब्रुवारीपासून बंगळुरू येथे होणा-या एअरो इंडिया-२०२५ मध्ये रशिया त्याचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान सुखोई एसयू-५७ पाठवत आहे. हे पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. भारताने हे लढाऊ विमान खरेदी करावे, अशी रशियाची इच्छा आहे. या रशियन विमानाने चीनमधील झुहाई एअर शोमध्ये भाग घेऊन आपली ताकद दाखवून दिली.
अमेरिकेचा दुश्मन असलेल्या रशियाकडून भारत पाचव्या पिढीचा अॅडव्हान्स सुखोई एसयू-५७ खरेदी करणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या महिन्यात आयोजित एअरो इंडिया-२०२५ मध्ये रशियन फायटर जेट भारतात येत आहे. रशियाचा अनेक वर्षांपासूनचा प्रयत्न आहे की, भारताने हे विमान खरेदी करावे. परंतु दिल्लीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ताज्या माहितीनुसार रशियन एअर फोर्सला २०२५ पासून पाचव्या पिढीच्या स्टील्थ फायटर जेटच्या अॅडव्हान्स व्हेरिएंटची डिलिव्हरी सुरु होणार आहे.
जगात तीनच असे देश आहेत, ज्यांच्याकडे पाचव्या पिढीचे लढाऊ विमाने आहेत. यामध्ये अमेरिका, चीन आणि रशिया या तीन देशांचा समावेश आहे. तुर्कीने देखील पाचव्या पिढीचे जेट तयार केले असून त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे.
एकीकडे पाकिस्तानने चीनकडून पाचव्या पिढीचे जेट खरेदी करण्याची घोषणा केली. त्यामुळे भारताच्या दोन्ही मोठ्या शत्रूंकडे पाचव्या पिढीचे अत्याधुनिक जेट असणार आहे. त्यामुळे भारतावरदेखील हे अत्याधुनिक जेट फायटर विमान खरेदी करण्याचा मोठा दबाव आहे. चीनकडून हे विमान भारत कदापि खरेदी करु शकत नाही.
अमेरिका त्यांचे विमान विक्रीसाठी जरी राजी झाला तरी अनेक अटी लादणार आणि रशियाचे जेट फायटर खरेदी केले तर अमेरिकेची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आणि वेळेत डिलिव्हरी होणार की नाही, याचीदेखील चिंता भारताला लागली आहे.
नवे सुखोई शक्तीशाली
एसयू-५७ चौथ्या पिढीपेक्षा खूपच प्रगत आहे. आम्ही २०२५ पासून रशियन वायू सेनेला हे विमान पुरविण्याच्या तयारीत आहोत, अशी माहिती कोम्सोमोल्स्क ऑन-अमूर एयरक्राफ्ट प्रोडक्शन एसोसिएशनचे संचालक यूरी कोंडराटयेव यांनी दिली. असे म्हटले जाते की, यात अॅडव्हान्स एएल-५१ एफ-१ हे इंजिन बसविण्यात आले असून त्यामुळे नवे सुखोई शक्तीशाली झाले आहे, असेही ते म्हणाले.