मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध भडकले आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. रशियाने काल रात्री युक्रेनमधील नागरी भागांवर भीषण हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनच्या दिशेने १०० हून अधिक ड्रोन डागले होते, रशियाच्या या हल्ल्यामध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये ३ मुलांसह ३८ जण जखमी झाले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत रशियन हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती युक्रेनियन अधिका-यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रशियाने युक्रेनच्या नागरी भागांवरील हवाई हल्ले वाढवले आहेत. त्यामुळे युक्रेनमधील मृतांची संख्या वाढायला लागली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर सुमारे १२७० ड्रोन, ३९ क्षेपणास्त्रे आणि सुमारे १००० शक्तिशाली ग्लाइड बॉम्बने हल्ला केला. तसेच रशियन सैन्य काही ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र युक्रेनियन सैन्याकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे.
रशियाकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला
रशियाने ४ जुलै रोजी युक्रेनची राजधानी कीववर सर्वात मोठा हवाई हल्ला केला होता. रशियाच्या या हल्ल्यात २३ जण जखमी झाले. या भीषण हल्ल्यामुळे कीवच्या अनेक भागांचे मोठे नुकसान झाले होते. रशियाने युके्रनवर ५५० ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले होत. यातील बहुतेक हल्ले शाहिद ड्रोनने केले होते, तर ११ क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात युद्धबंदीबाबत झालेल्या चर्चेनंतर काही तासांतच हा हल्ला झाला होता.
युक्रेनकडूनही प्रत्युत्तर
रशियाच्या भीषण हल्ल्यांनंतर युक्रेननेही मॉस्कोवर हल्ला केल्याचा दावा केला होता. युक्रेनने म्हटले होते की, आमच्या सैन्याने रशियाच्या व्होरोनेझ प्रदेशात असलेल्या बोरिसोग्लेब्स्क एअरबेसवर हल्ला केला आहे. हा एअरबेस एक महत्वाचा एअरबेस आहे. रशियाच्या एसयू-३४, एसयू ३५ एस आणि एसयू-३० एसएम लढाऊ विमानांचा मुख्य तळ आहे, मात्र यात रशियाचे किती नुकसान झाले याची माहिती समोर आलेली नाही.