विश्वात अनंत ता-यांमध्ये सूर्य हा सर्वांत जवळचा तारा. यावर अनेक उलथापालथी होत असतात. त्यातल्या काहींमध्ये वारंवारता दिसून येते. सूर्य समजला की विश्वातील तारे व त्यांचा अभ्यास करणे सुलभ होते. या उद्देशाने ‘इस्रो’ने हाती घेतलेल्या ‘आदित्य एल१’ मिशनला अलीकडेच मोठे यश लाभले. ‘चांद्रयान-३’च्या यशानंतर २ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सुरू झालेला सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटरचा प्रवास निर्धारित स्थानावर पोहोचला आहे. भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाची साक्ष नव्याने यानिमित्ताने जगाला पटली आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘एक्स्पोसॅट’चे यशस्वी प्रक्षेपण करून नवा इतिहास रचणा-या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) आणखी एक मोठे यश आले आहे. देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाने सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँग्रेज पॉईंट -१’ (एल १) वर यशस्वीरीत्या पोहोचण्याचा विक्रम केला आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान ११० दिवसांनी पोहोचले आहे. ‘आदित्य-एल १’ ही सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बा वातावरणाचा अभ्यास करणार आहे. चांद्रयान-३ च्या यशानंतर २ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सुरू झालेला सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटरचा प्रवास निर्धारित स्थानावर पोहोचला आहे. भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाची साक्ष नव्याने यानिमित्ताने जगाला पटली आहे. अत्यंत क्लिष्ट आणि वेधक अंतराळ मोहिमा साकारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवणे आणि अथक समर्पणभावाने त्या यशस्वी करणे ही इस्रोच्या संशोधकांची ओळख झाली आहे.
विश्वात अनंत ता-यांमध्ये सूर्य हा सर्वांत जवळचा तारा. यावर अनेक उलथापालथी होत असतात. त्यातल्या काहींमध्ये वारंवारता दिसून येते. सूर्य समजला की विश्वातील तारे व त्यांचा अभ्यास करणे सुलभ होते. सूर्यावर सौरडागांची संख्या व त्यामधील वारंवारतेचा गेल्या तीन शतकांपासून दररोज अभ्यास केला जात आहे. प्राचीन साहित्यामध्ये तेज:पुंज म्हणून उल्लेखला गेलेला सूर्य हा महाकाय ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्याच्या तापमानाचा विचार केल्यास दहा हजार फॅरनहिट (५५०० अंश सेल्सिअस) आहे. या ठिकाणी उर्त्सजित होणा-या न्यूक्लिअर रिअॅक्शन्समुळे सूर्यमंडळाचे तापमान ७ दशलक्ष फॅरनहिट किंवा १५ दशलक्ष सेल्सिअसपर्यंत पोचते. नासाच्या मते, शंभर अब्ज टन डायनामाईटच्या स्फोटानंतर निर्माण होणारी उष्णता ही सूर्याच्या तापमानाएवढी आहे. सूर्यामधून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडत असते. त्याचबरोबर सौरज्वालाही बाहेर पडत असतात. त्या ज्वालांची दिशा पृथ्वीकडे वळली तर अंतराळ यान, उपग्रह आणि संपर्क यंत्रणा खराब होऊ शकते. आदित्य एल १ अशा सोलर इव्हेंट्सची वेळेवर माहिती देईल, जेणेकरून नुकसान कमी करता येईल.
प्रत्येक ग्रहाजवळ असे काही पॉईंट असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती, अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून सूर्याची तेथून निरीक्षणे नोंदवणे, अभ्यास करणे शक्य असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असे पाच पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना लँग्रेज पॉईंट १ ते ५ अशी नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी एल १ या पॉईंटपर्यंत आदित्य यान जाणार आहे. तेथून ते निरीक्षणे नोंदवेल. लँग्रेज पॉईंट हे नाव इटालियन संशोधक जोसेफ लुई लँग्रेज यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.
‘आदित्य’ने हा एल १ पॉईंट गाठला आहे. आता हॅलो ऑर्बिटपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ही एल-१ ची अशी एक कक्षा आहे जिथे उपग्रह आणि अवकाशयान स्थिर राहून कार्य करू शकतात. जर हे वाहन या कक्षेत पोहोचले नाही तर ते सूर्याकडे प्रवास करत राहील आणि नंतर त्यात विलीन होईल. हॅलो ऑर्बिटमधून ‘आदित्य’ वेगवेगळ्या कोनातून सूर्याचा अभ्यास करू शकणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथे ग्रहणाचा अडथळा येणार नाही. कारण पृथ्वी ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरते त्याचप्रमाणे ही कक्षा एल-१ बिंदूभोवती फिरते.
आत्तापर्यंत इस्रो जमिनीवर आधारित दुर्बिणीद्वारे सूर्याचा अभ्यास करत असे; परंतु यामुळे सूर्याचे वातावरण सखोलपणे दिसून येण्यास मर्यादा येत होत्या. विशेषत:, सूर्याचा बाहेरचा थर, कोरोनाइतका धगधगता का आहे आणि त्याचे तापमान नेमके किती आहे हे माहीत नाही. पण आदित्यसोबत गेलेली उपकरणे यावर प्रकाश टाकणार आहेत. यापैकी व्हीईएलसी ही एक दुर्बिण आहे, जी २४ तास सूर्याच्या कोरोनावर लक्ष ठेवेल आणि दररोज १,४४० छायाचित्रे पाठवेल. सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरच्या प्रतिमा घेईल. सोलेक्स आणि हिलियस ही उपकरणे सूर्याच्या क्ष-किरणांचा अभ्यास करतील. आस्पेक्स आणि प्लाझ्मा विश्लेषक सौर वादळांचा अभ्यास करून त्यांची ऊर्जा किती आहे हे समजावून सांगतील. मॅग्नेटोमीटरद्वारे एल-१ बिंदूभोवतीच्या चुंबकीय क्षेत्राची गणना केली जाईल. आदित्य-एल१ वरून सूर्याची
पहिली प्रतिमा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्याच सौरमोहिमेत भारताने सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी वेधशाळा स्थापन केली आहे. पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर अंतरावर ‘आदित्य’ने आपले ध्येय यशस्वीपणे गाठणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. सूर्याच्या कक्षेत गेलेल्या या यानाचे एकूण वजन हे १४७५ किलोग्रॅम एवढे आहे. यावर जी सात उपकरणे बसवली आहेत त्यांचे वजन हे २४४ किलोग्रॅम एवढे आहे. आदित्य एल-१ मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षेत टिकू शकेल. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत उद्रेक होत असतात. कोणत्याही स्फोटाचे कोणतेही परिणाम या यानावर होणार नाहीत. या मोहिमेचा खर्च हा जवळपास ३७८ कोटींपर्यंत असणार आहे. भारतीय शास्त्रज्ञांचे विशेष कौतुक होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अत्यंत कमी खर्चात ही मोहीम पार पडणार आहे. भारत विज्ञानाच्या सीमा विस्तारत असून त्यांचा लाभ येणा-या काळात सबंध जगाला होणार आहे. या अत्यंत आव्हानात्मक मिशनचे सर्व घटक सुरळीतपणे कार्यरत असल्याचे प्रारंभिक संकेत दर्शवताहेत. आदित्य पुढील पाच वर्षे संशोधन आणि संशोधनाच्या माध्यमातून मानवतेच्या कल्याणासाठी नवीन माहिती गोळा करणार आहे. या मोहिमेच्या यशामुळे भविष्यात इतर ग्रहांवर संशोधनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
इतिहासात डोकावल्यास आतापर्यंत हेलिओज-१ हे यान सूर्यापासून २९ दशलक्ष मैल म्हणजेच ४७ दशलक्ष किलोमीटर अंतरावर पोहोचले होते. हे यान डिसेंबर १९७४ मध्ये पाठविण्यात आले होते. हेलिओज-२ हे दुसरे यान एप्रिल १९७६ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते आणि सूर्यापासून १.८ दशलक्ष मैल म्हणजेच ३ दशलक्ष किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचण्यात या यानाला यश आले होते. ऑगस्ट २००४ मध्ये मेसेंजर हे यान बुध ग्रहाच्या दिशेने पाठविण्यात आले होते. सूर्यापासून हा ग्रह ३६ दशलक्ष मैल म्हणजे ५८ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. नासाच्या पार्कर सोलर प्रोब या यानाने सूर्याच्या वातावरणात प्रवेश केला होता. हे यश आणि त्यासंदर्भातील प्रारंभिक निरीक्षणांची घोषणा १४ डिसेंबर रोजी अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे करण्यात आली. नासाची ही मोहीम २०१८ मध्ये सुरू झाली होती.
– श्रीनिवास औंधकर,
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ