कोल्हापूर : माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. २००९ मध्ये झालेली जखम अजूनही विसरलेलो नाही, असे सांगत त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत आज कोल्हापुरातून बोलताना दिले. संभाजीराजे यांनी बोलताना स्वराज्य संघटना लोकसभा निवडणुकीत मुख्य प्रवाहात असल्याचा दावा केला.
‘स्वराज्य’बाबत सकारात्मक चर्चा सुरू
संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सांगितले की, स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात राहणार यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. मात्र आम्ही किती जागा लढविणार याबाबत अजून स्पष्टता नाही. आमच्यावर २००९ मध्ये झालेल्या जुन्या जखमा आम्ही अजूनही विसरलो नाही. आमच्यावर कोणीही वार करू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला सर्वांना दिसेल. ‘स्वराज्य’बाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, त्यामुळे संभाजीराजे लढणार की नाही हे वेळच ठरवेल.
दरम्यान, कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर हा निर्णय सुद्धा वेळ ठरवेल असे सुद्धा त्यांनी सांगितले. त्याचबरोबर चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे ते म्हणाले. जे कोणी जास्त प्रेम देतील तिथे संभाजीराजे उभारणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लोकसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची घोषणा एक प्रकारे संभाजीराजे यांनी करून टाकली आहे.
मराठा आरक्षणावरून आक्रमक
दरम्यान, डिसेंबर महिन्यात मराठा आरक्षणावरून संभाजीराजे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी दखल घेतली नाही, तर गाठ आमच्याशी आहे. आम्ही दिल्लीत ठाण मांडून बसू, थंडीत आंदोलन करू असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याच प्रश्नासंबंधी त्यांनी केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती.