नागपूर : विशेष प्रतिनिधी
रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीत उघड फूट पडल्याचे दिसत आहे. मविआत रामटेकची जागा ठाकरेंना सोडण्यात आली. त्याठिकाणी ठाकरेंनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांच्या उमेदवारीविरोधात राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली. काँग्रेसने राजेंद्र मुळक यांना पक्षातून निलंबित केले असले तरी रामटेकच्या प्रचारसभेत उघडपणे काँग्रेस नेते मुळक यांच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे.
मविआतील ठाकरेंचा उमेदवार पाडण्यासाठी आणि अपक्ष राजेंद्र मुळक यांना विजयी करण्यासाठी रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे आणि माजी मंत्री सुनील केदार उघडपणे त्यांच्या व्यासपीठावर प्रचारसभा, रॅली घेत आहेत. रामटेकमध्ये मुळक यांच्याशिवाय पर्याय नाही. आम्ही लोकभावनेचा आदर करत मुळक यांच्यासोबत आहोत. राजेंद्र मुळक हे जिंकून आल्यानंतर आपल्यासोबतच राहतील असा विश्वास खासदार शामकुमार बर्वे यांनी सभेत व्यक्त केला.
विशेष म्हणजे उमरेड मतदारसंघात निलंबित काँग्रेस नेते राजेंद्र मुळक हे अधिकृत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना दिसतात. टेन्शन घेऊ नका, निवडणूक होऊ द्या, मी जिथे होतो, तिथेच परत येणार आहे. संजय मेश्राम हे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना विजयी करा. विधानसभेला संजय मेश्राम माझ्या बाजूला बसणार आहेत असा विश्वास माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी दिला. सकाळी बंडखोर उमेदवाराचा प्रचार काँग्रेस नेते करतात तर संध्याकाळी बंडखोर उमेदवार शेजारच्या मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार करतात त्यामुळे काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे. या काँग्रेस नेत्यांच्या उघड प्रचारामुळे लोकसभेसारखा सांगली पॅटर्न विदर्भात सुरू असून ठाकरेंना पुन्हा फटका बसण्याची शक्यता बळावली आहे.