मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याबद्दल आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याचे सूतोवाच आज शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.
निकालामुळे व्यथित झालेल्या लोकांकडून मर्यादा सोडून भाषा सुरू आहे. आम्ही कालपासून ऐकत आहोत की, मग ठाकरेप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे विश्वज्ञानी प्रवक्ते मॅच फिक्ंिसगचा आरोप करीत आहेत. मॅच फिक्ंिसग असते तर उबाठा गटाचे १४ आमदारही अपात्र झाले असते; पण कायद्याच्या चौकटीत विधिमंडळ नियमाच्या सर्व तरतुदीचं पालन करून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून असंवैदनशील शब्दांचा वापर करण्यात आला आहे. न्यायालयाचा निकाल मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्या विरोधात अवमान टीका करीत असाल तर ती गैर लागू आहे. यामुळे निश्चितच त्यांच्यावर विधानसभेत हक्कभंग आणावा लागेल त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची आमची कार्यवाही सुरू झाली असल्याचे देसाई यांनी सांगितले.