23.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeक्रीडादोन महिला कुस्तीपटूंचा कुस्तीत्याग

दोन महिला कुस्तीपटूंचा कुस्तीत्याग

संजय सिंह ब्रजभूषण यांचे निकटवर्तीय, महिला कुस्तीपटू नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. संजय सिंह यांच्या पॅनलला ४० मते मिळाली तर प्रतिस्पर्धी राष्ट्रीय खेळातील पदक विजेती अनिता श्योराणला फक्त ७ मते मिळाली. संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी कुस्तीला रामराम ठोकला. या नाराज कुस्तीपटूंनी थेट निवृत्ती जाहीर केली.

संजय सिंह हे मूळचे वाराणसी येथील आहेत. त्यांनी आरएसएससाठी काम केले. भाजप खासदार बृजभूषण यांचा विश्वासू म्हणूनही त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या सात-आठ महिन्यांत नुकसान झालेल्या देशातील हजारो पैलवानांचा हा विजय आहे. महासंघात सुरू असलेल्या राजकारणाबाबत त्यांनी आम्ही कुस्तीगीर राजकारणाला राजकारणाने आणि कुस्तीला कुस्तीने उत्तर देऊ, असे सांगितले. प्रेमचंद लोचब यांनी दर्शनलाल यांचा पराभव केल्याने अनिता श्योराण यांच्या पॅनलला सरचिटणीसपद राखता आले. त्यानंतर संजय सिंह यांच्या पॅनलने उपाध्यक्षपदाची चारही पदे जिंकली. तसेच ब्रिजभूषण यांच्या गटाचे सत्यपालसिंग देसवाल नवे कोषाध्यक्ष असतील. तसेच पाच सदस्यही मावळत्या अध्यक्षाांया गटातील आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीदरम्यान, पहिलवान बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी थेट संजय सिंह यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवत थेट केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी ठाकूर यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याशी संबंधित कोणीही निवडणूक लढणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु घडले निराळेच. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लढा उभारणारे बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक नाराज झाले आहेत.

मागील काही महिन्यांपासून ब्रिजभूषण यांच्या विरोधात ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन केले होते. डब्ल्यूएफआयमधील बदलासाठी त्यांनी आक्रमक प्रचार केला होता. पण त्यांना कुस्ती जगताचा पाठिंबा मिळाला नाही. साक्षी मलिकसह आघाडीच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. पण ब्रजभूषण यांचा विश्वासू संजय सिंह यांचा विजय झाल्यानंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी कुस्ती कायमची सोडण्याचा निर्णय घेतला.

मी कधीच कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही
आम्ही लढाई लढली. पूर्ण ताकदीने लढली. मात्र भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर ब्रजभूषण सिंह याचा माणूस राहणार असल्यास मी कुस्तीचा त्याग करते. अध्यक्षपदी निवड झालेली व्यक्ती ही ब्रजभूषण सिंह यांचा सहकारी आहे. त्यांचा बिजनेस पार्टनर आहे. मी आता कधीही कुस्तीच्या मैदानात दिसणार नाही, असे म्हणताना साक्षी मलिकला रडू कोसळले. ती हातात बूट घेत रडू लागली.

काय म्हणाली विनेश फोगट?
आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न केले आणि नंतर दिल्लीच्या रस्त्यावर बसलो. आम्हाला तीन-चार महिने थांबायला सांगितले होते, पण काहीही झाले नाही. संजय सिंह यांना आज अध्यक्ष करण्यात आले. त्यामुळे खेळातील मुलींना पुन्हा बळी पडावे लागेल. आम्हाला न्याय कसा मिळेल हे माहीत नाही, अशा शब्दांत विनेश फोगट हिने आपली हतबलता व्यक्त केली.

आम्ही मुलींसाठी लढत आहोत
बजरंग पुनिया म्हणाला की, आमचा लढा पूर्वी सरकारशी नव्हता आणि आजही नाही. आम्ही कधी कुस्ती करू शकू असे वाटत नाही. आम्ही राजकारण करण्यासाठी नाही तर आमच्या बहिणी आणि मुलींसाठी लढण्याकरिता आलो आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR