20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरसतीश चव्हाण यांचा ‘घरचा आहेर’

सतीश चव्हाण यांचा ‘घरचा आहेर’

शरद पवार गटाचा ठेंगा, प्रशांत बंब अडचणीत

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी अजित पवार गटांतील पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी महायुतीसह पक्षाला घरचा आहेर दिला. आचारसंहिता लागू होताच त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी शरद पवार यांच्या गटात जाण्यासाठी चाचपणी करून पाहिली मात्र ठेंगा दाखविण्यात आल्याचे समजते. अस्वस्थ सतीश चव्हाण यांनी गंगापूरमधून उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

सतीश चव्हाण यांना आपल्या उमेदवारीचा पत्ता कट होण्याची कुणकुण लागल्याने त्यांनी हा घरचा आहेर दिला की काय, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी गंगापूरमधून उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र यामुळे प्रशांत बंब यांच्यासमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. आमदार चव्हाण यांनी म्हटले, की जवळपास दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल, अशी अपेक्षा होती. परंतु, सरकार बहुजनांचे प्रश्न मिटवू शकले नाही.

दरम्यान, आमदार चव्हाण यांना तिकीट मिळणार नसल्याची कुणकुण लागताच त्यांनी मराठा आरक्षणाकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येते. मुस्लिम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाकडे देखील या सरकारने सकारात्मकपणे पाहिले नाही, असा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला आहे. या वर्षभरात आमदार चव्हाण यांनी यावर ‘ब्र’ शब्दही का काढला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मागील एक ते दीड महिन्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पुन्हा जाण्यासाठी चाचपणी केली; परंतु त्यांचे परतीचे दोर कापल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR