27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयबाबासाहेबांच्या संविधानाने वाचवले : सिसोदिया

बाबासाहेबांच्या संविधानाने वाचवले : सिसोदिया

नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी गेल्या १७ महिन्यांपासून तिहार तुरुंगात कैद असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज अखेर जामीन मिळाला. जामिनाची प्रत मिळाल्यानंतर तिहार प्रशासनाने सायंकाळी त्यांची सुटका केली. यावेळी तुरुंगाबाहेर आपच्या मंत्र्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सिसोदिया यांचे जंगी स्वागत केले. दरम्यान, बाहेर येताच सिसोदियांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी ते म्हणाले की हुकूमशाहीने मला तुरुंगात टाकले होते, पण बाबासाहेबांच्या संविधानाने बाहेर काढले. कोणत्याही हुकूमशाही सरकारने संविधानाचा दुरुपयोग करू नये असे बाबासाहेबांचे स्वप्न होते. आता याच संविधानाच्या ताकदीने अरविंद केजरीवालही बाहेर येतील. गेल्या १७ महिन्यांपासून फक्त मीच तुरुंगात नव्हतो, तर दिल्लीतील प्रत्येक व्यक्ती, दिल्लीतील शाळेचा प्रत्येक विद्यार्धी माझ्यासोबत होता. मी सर्वोच्च न्यायालयाचेही मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया सिसोदिया यांनी दिली.

आज सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय सिंह म्हणाले की, सिसोदिया यांचा जामीन म्हणजे हुकूमशाही, हिटलरशाही आणि मोदी सरकारला मारलेली चपराक आहे. ईडी आणि सीबीआयला सिसोदिया यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तपास यंत्रणेने छापेमारी केली, मात्र कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. ज्यांनी शिक्षणात क्रांती केली, त्यांना तुरुंगात टाकले. आरोग्य क्षेत्रात क्रांती करणा-या सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकले. मी प्रश्न विचारल्यावर मलाही तुरुंगात टाकले. सरकारचा हेतू तपासाचा नसून विरोधकांचा आवाज दाबण्याचा आहे. तुमच्याकडे कोणताही पुरावा नाही. सरकारने किमान आता तरी हे राजकारण थांबवावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR