बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात २०१४ साली जिल्हा परिषद शिक्षक आंतर जिल्हा बदलीमध्ये तत्कालीन मंत्री सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जिल्हा परिषद शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांनी तब्बल ३९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बीड मधील बिंदू नामावलीच्या घोटाळ्यासंदर्भात सुरेश धस यांनी तक्रार केल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बाळासाहेब सानप म्हणाले की, १४ वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेत बिंदू नामावली प्रश्न उद्भवला आहे. ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या, त्या काळात २०१४ साली सर्व शिक्षकांनी मागणी केली होती की, बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे. त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते. त्या काळात ही भरती झाली आहे. त्या काळात प्रत्येक जणांकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. तेराशे लोकांचे तीन लाख रुपये म्हणजेच एकूण जवळपास ३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असा आरोप त्यांनी केला.
सुरेश धस यांनी स्टेटमेंट केले की, पंकजा मुंडे मंत्री असताना हा घोटाळा झाला आहे. परंतु पंकजा मुंडे त्यावेळी मंत्री नव्हत्या. या भरती प्रक्रियेत पंकजा मुंडे यांचा कुठलाही संबंध नव्हता. २०१४ साली इतके सगळे शिक्षक बीडमध्ये आले, तेव्हा ७०० लोकांना पगार मिळत नव्हता. दीड वर्ष शिक्षकांनी येथे आंदोलन केले होते. या आंदोलनाला कारणीभूत हे तिघेच आहेत. जागा नसताना भरती करून घेण्यात आली, याचे देखील कारण हे तिघेच आहेत. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे.