पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात काही दिवसांपूर्वी एका २१ वर्षांच्या तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामधील दुस-या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींपैकी दुस-या २५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. तीन आरोपींपैकी आतापर्यंत २ आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार असून पुणे पोलिसांकडून तिस-या आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पहिल्या आरोपीला ११ ऑक्टोबर रोजी अटक झाली होती.
चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, ंिडडोरी, मध्य प्रदेश) असं या आरोपीचं नाव आहे. यातील तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी बोपदेव घाटात गुरुवारी (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास मद्य प्राशन केले. त्यानंतर त्यांनी घाटात बसलेल्या तरुण-तरुणीला बांबूने मारहाण केली. कोयत्याच्या धाक दाखवून तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर ते सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात गेले.
आरोपींचे चेहरे स्पष्ट
पोलिसांना चकवा देण्यासाठी मुख्य रस्त्याऐवजी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला. सुमारे २० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ८० किलोमीटरचा प्रवास केला. सासवड परिसरात एका पेट्रोल पंपावरील चित्रीकरणात आरोपींचे चेहरे स्पष्ट आढळून आले होते. तसेच, एका मद्य विक्री दुकानात मद्य सेवन करीत असल्याचे दिसून आले.