इस्लामाबाद : मंगळवारी इराणने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकला पाकने आज प्रत्युत्तर दिले. पाकिस्ताने इराणमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवारी इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागामध्ये हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला होता, तर तीन मुली जखमी झाल्या होत्या. यानंतर पाकिस्तानने या प्रकाराचा निषेध व्यक्त केला होता. तसेच या हल्ल्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही पाकिस्तानने इराणला दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने इराणमधील आपल्या राजदूताला परत बोलावून घेतले होते. तसेच, इराणच्या राजदूतांना पाकिस्तानात परत न येण्याची ताकीद दिली होती. आज पाकिस्तानने इराणवर हल्ला केल्याची माहिती त्यांच्याच परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. इराणमधील कित्येक दहशतवादी तळ या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आल्याचे पाकिस्तानने सांगितले. तसेच या कारवाईत कित्येक दहशतवादी ठार झाल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. इराणमधील सिएस्तान-ओ-बलुचिस्तान या प्रांतात पाकिस्तानने हल्ले केले. बीएलए या इराणमधील दहशतवादी संघटनेचे तळ आपण उद्ध्वस्त केले आहेत, असं पाकिस्तानने स्पष्ट केले. या ऑपरेशनला मार्ग बार सर्माचार असें कोडनेम देण्यात आले होते असेही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
चीनचा मध्यस्तीचा प्रयत्न
इराणच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आधीच ताणले गेले होते. मित्र राष्ट्र म्हणून चीन या दोन्ही देशांमध्ये मध्यस्तीचा प्रयत्न करत होता. मात्र आता पाकिस्तानने तडकाफडकी हल्ल्याचा निर्णय घेत, ऑपरेशन राबवले असल्यामुळे चीनचे प्रयत्न वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणने अद्याप पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीच बिघडले असल्याचे दिसत आहे.