मुंबई : वर्षाच्या शेवटी किंग खानचा ‘डंकी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा हिट होतो की फ्लॉप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर यातच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांपूर्वीच शाहरूख खान पुन्हा एकदा माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. यापूर्वी देखील शाहरूख सिनेमा रिलिजपूर्वी देवीच्या दर्शनासाठी गेला आहे.
दरम्यान, बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान हा सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. यंदाचे वर्ष शाहरूखसाठी खूपच खास होते. या वर्षात शाहरूखने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवले आणि तो बादशाह कसा हे सिद्ध केले. त्याने ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे दोन सिनेमे बॉलिवूडला दिले, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर हजार कोटींचा टप्पा पार केला. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांना शाहरूखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाकडूनही खूप अपेक्षा आहेत.
मंगळवारी सकाळी वैष्णोदेवीचे त्याने दर्शन घेतले. शाहरूखचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी शाहरूख खान डार्क चष्मा आणि त्याच रंगाच्या हुडी जॅकेटमध्ये दिसला. त्याने आपला चेहरा लपवला होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला घेरले होते.
शाहरूख खान आता त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जातो अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण ‘पठाण’ आणि ‘जवान’ रिलीज होण्यापूर्वी शाहरुख माँ वैष्णो देवीच्या दरबारात गेला होता. हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते. त्यामुळे आता ‘डंकी’ चित्रपट देखील ब्लॉकबस्टर ठरेल अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली.
‘डंकी’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा सिनेमा २१ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे.
या चित्रपटात शाहरूख खानव्यतिरिक्त तापसी पन्नू, विकी कौशलसह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय बोमन इराणी, सतीश शाह, दिया मिर्झा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘डंकी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या ‘सालार’शी स्पर्धा करणार आहे. त्यामुळे हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.