24.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeसंपादकीय विशेषनववर्षातील ‘एआय’ची दिशा

नववर्षातील ‘एआय’ची दिशा

गतवर्षामध्ये माहिती-तंत्रज्ञानाच्या विश्वात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोरदार चर्चा राहिली. वर्ष सरता सरता डीपफेकच्या वाढत्या आव्हानाविषयीही जागतिक चिंता समोर आल्या. आता चालू वर्षी एआयची नवी रूपे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही धोकेही दुर्लक्षून चालणार नाहीत. युरोपीयन महासंघाच्या सायबर सुरक्षा एजन्सीच्या मते, त्यांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास हा सायबर सुरक्षित ठेवणारी व्यवस्था अणि माहिती कितपत विश्वासू आहे, यावर अवलंबून असेल, असे म्हटले होते. यंदाच्या निवडणूक वर्षामध्ये एआय कोणती कमाल दाखवते हे पहावे लागेल.

पीराईटचा संघर्ष असो किंवा डीपफेकमुळे निवडणुकीतील गैरप्रकार होण्याची शक्यता असो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वात यावर्षी कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एआयचा उपयोग हा प्रत्येक ठिकाणी होत आहे. बराच काळ ही बाब विज्ञानाच्या पुस्तकापर्यंत मर्यादित होती आणि कोणत्याही हेतूशिवाय होणा-या संशोधनाचा भाग होती. मात्र आता चॅटजीपीटी आणि बार्ड चॅटबोट्ससारख्या एआय तंत्रज्ञानाच्या लाखो-कोट्यवधी लोकांकडून त्याचा वापर होत आहे. तरीही तज्ज्ञांच्या मते, सध्याचा एआयचा आविष्कार हा आगामी काळातील एक ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी आहे. एडा लर्निंग नावाच्या स्टार्टअपच्या चीफ इनोव्हेशन ऑफिसर आणि एआयवर लिहिणा-या लेखिका लेआ स्टाइनाकर म्हणतात, एआय आता आयफोन मोमेंट ओलांडून पुढे गेला आहे. त्यांचा अंगुलीनिर्देश २००७ मध्ये अ‍ॅपलच्या स्मार्टफोनकडे होता. या मोबाईलवर इंटरनेट अवतरले आणि क्रांती घडली. स्टाइनाकर यांच्या मते, चॅटजीपीटी आणि त्यासारख्या अ‍ॅप्लिकेशन्समुळे एआय टूल हे सर्वसामान्यांपर्यंत पोचले आहे आणि सर्वंकष रूपाने त्याचा परिणाम समाजावर झाला आहे.

निवडणुकीवर डीपफेक्सचा परिणाम
कथित जेनरेटिव्ह एआय प्रोग्रॅमच्या माध्यमातून कोणताही व्यक्ती काही सेकंदातच कामचलाऊ गोष्टींतून ठोस, परिणामकारक मजकूर आणि चित्र तयार करू शकतो. अर्थात डीपफेक अस्तित्वात येण्यापूर्वी जगात सुलभ आणि सहजपणे मिळणारे तंत्रज्ञान उपलब्ध असायचे आणि एखाद्याने वक्तव्य केलेले नसले तरी ते त्यांच्या तोंडी घातलेले दिसायचे. तज्ज्ञांच्या मते, नवे वर्ष सरताना अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येईल आणि युरोपीय संसदेच्या निवडणुकांच्या तारखा जवळ येतील तसतसे जनतेवर परिणाम करणा-या किंवा मतदानापूर्वी अशांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने डीपफेकच्या प्रमाणात वाढ होताना दिसेल.

युरोपीयन महासंघाच्या सायबर सुरक्षा एजन्सीने ऑक्टोबर २०२३ मध्ये एक धोक्याचा इशारा देणारा अहवाल सादर केला आहे. या संस्थेचे कार्यकारी संचालक युहान लेपसार यांनी, युरोपीय संघाच्या निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास हा सायबर सुरक्षित ठेवणारी व्यवस्था आणि माहिती कितपत विश्वासू आहे, यावर अवलंबून असेल, असे म्हटले होते.
डीपफेकचा परिणाम कितपत होईल, ही बाब काही अंशी सोशल मीडिया कंपनीकडून तोडगा काढण्यासाठी होणा-या प्रयत्नांवर अवलंबून असेल. गुगलच्या यूट्यूब आणि मेटाचे फेसबुक तसेच इन्स्टाग्रामसारख्या अनेक प्लॅटफॉर्मनी ‘एआय’ची सामग्री पकडण्यासाठी धोरण लागू केले आहे आणि यावर्षी ते धोरण कितपत उपयुक्त आहे, हे देखील समजू शकेल. जेनरेटिव्ह एआय टूल विकसित करण्यासाठी कंपन्या अंतर्निहित मॉडेलला इंटरनेटकडून मोठ्या प्रमाणात मिळणारे टेक्स्ट आणि फोटोच्या माध्यमातून प्रशिक्षित करत असतात. सध्या मूळ निर्मात्याकडून, लेखकांकडून, चित्रकार आणि फोटोग्राफरकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्या स्रोतांचा वापर केला जात आहे.

मात्र ज्यांच्याकडे या साम्रगीचा अधिकार आहे, ते या कृतीस कॉपीराईटचे उल्लंघन मानतात आणि त्याविरुद्ध संघर्ष करत आहेत. अलीकडेच ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ चॅटजीपीटी कंपनी ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यावर खटला भरण्याचा विचार करत आहे. या कंपनीने परवानगी न घेता वर्तमानपत्रातील लेखांचा वापर केल्याचा ठपका ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने ठेवला आहे. जॉन ग्रीशम आणि जोनाथन फ्रेजेनसह प्रमुख अमेरिकी कादंबरीकारांच्या एका गटाने त्यांच्या साहित्यांचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत सॅन फ्रान्सिस्कोच्या ‘ओपनएआय’वर खटला दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उदा. फोटो एजन्सी ‘गेटी इमेजेस’ने एआय कंपनी स्टेबिलिटी एआयवर खटला दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. स्टेबल डिफ्यूजन इमेज क्रिएशन सिस्टिम ही स्टेबिलिटी एआय कंपनीने तयार केली आहे. या प्रकरणातील पहिला निकाल २०२४ रोजी येऊ शकतो आणि त्यावर कॉपीराईटच्या सध्याच्या नियमांत आणि कायद्यात एआयच्या पातळीवर कशी सुधारणा करण्याची गरज आहे, हे लक्षात येईल.

एआयची शक्ती कोणाच्या हाती
एआय तंत्रज्ञान हे जसजसे विकसित होत होईल तसतसे कंपन्यांना अंतर्निहित मॉडेल विकसित करणे आणि त्याला प्रशिक्षण देणे कठीण राहील आणि महागडे होत जाईल. ‘डिजिटल राईट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट्स’ च्या मते भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा ही बोटावर मोजण्याइतपत शक्तिशाली कंपन्यांकडे केंद्रित होऊ शकते. ब्रुसेल्स येथील स्वयंसेवी संस्था ‘एक्सेस नाऊ’ च्या युरोपीय पॉलिसी अँड अ‍ॅडव्होकेसी विभागाच्या संचालिका फॅनी हिडवेगी म्हणतात, काही कंपन्यांच्या हाती पायाभूत रचना, कॉम्प्युटिंग पॉवर, डेटा याची केंद्रीकृत होणारी शक्ती पाहिल्यास तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दीर्घकाळापासून असणा-या समस्येचे ते द्योतक आहे. जसजसे तंत्रज्ञान लोकांच्या आयुष्याचा अनिवार्य घटक होईल, तसतसे कंपन्या या ‘एआय’ हे समाजाला कशा रीतीने नियंत्रित करेल, हे ठरवतील.

एआय कायदा कसा लागू केला जाईल
ज्याप्रमाणे मोटारीत सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान देखील नियमांद्वारे नियंत्रित करणे गरजेचे आहे. अनेक वर्षांच्या चर्चेनंतर डिसेंबर २०२३ मध्ये युरोपीय संघ हे एआय अधिनियमावर राजी झाले आणि ते एआयसाठीच्या वैशिष्ट्यपूर्ण कायद्याचे जगातील पहिले व्यापक रूप आहे. आता सर्वांचे लक्ष ब्रुसेल्स येथील नियामक घडामोडींवर असणार असून ते योग्य मार्गाने चालतात की नाही ते पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच त्यास आणखी नवीन नियम जोडतील का हे पाहणे देखील आवश्यक आहे. नियमात काय असेल आणि कशा प्रकारचे बदल हवेत यावर जोरदार चर्चा होण्याची आशा आहे. लेना स्टाइनाकर म्हणतात, हे खूप गुंतागुंतीचे प्रकरण आहे आणि कालांतराने अडचणी येऊ शकतात. त्या म्हणतात, अमेरिकेप्रमाणेच युरोपीय संघात देखील या नव्या कायद्याच्या व्यावहारिकतेवर दीर्घकाळ चर्चा करण्याची अपेक्षा करू शकतो.

– शहाजी शिंदे, संगणकप्रणाली तज्ज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR