39.6 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदे, पवार गटाला कमळ चिन्हाचा पर्याय!

शिंदे, पवार गटाला कमळ चिन्हाचा पर्याय!

मुंबई : प्रतिनिधी
महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या १३ जागांचा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे. पण यातील ४ ते ५ उमेदवारांविषयी नाराजी आहे. त्यामुळे ‘जागा शिंदे गटाला, उमेदवार भाजपचा’ असा नवा प्रस्ताव देण्यात आला आहे. याशिवाय शिंदे गटाच्या काही खासदारांच्या हातात कमळ चिन्ह देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर दोन दिवसांत निर्णय होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिंदे गटाच्या खासदारांनी उमेदवारी द्या, कमळावर लढण्यास तयार असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे काही जागांवर तशी तडजोड होऊ शकते.

महायुतीच्या जागा वाटपाबाबत मुंबई आणि दिल्ली पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट आणि राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने वीस जागांचा आग्रह धरला आहे. पण यातील काही जागांवरील उमेदवाराविषयी नाराजी आहे. ही नाराजी भोवण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे भाजपने फक्त ‘जिंकणा-या उमेदवारास जागा’ हा फॉर्म्युला सांगितला. यामध्ये शिंदे गटाच्या काही जागा बसत नाहीत. यामुळे उमेदवारीचा शब्द घेऊन आलेल्या खासदारांची मोठी अडचण आहे.
भाजपला काहीही करून महाराष्ट्रात ‘चाळीस पार’चा आकडा गाठायचा आहे. यामुळे शिंदे गटाला जागा देताना काही ठिकाणी उमेदवारी भाजप नेत्याला देण्याची व्युहरचना आखण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील चार ते पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. शिंदे गटाला जागा देताना काही ठिकाणी उमेदवार मात्र भाजपकडे असलेल्या ताकदीच्या नेत्याला देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यासाठी पर्याय म्हणून नावेही सुचविण्यात आली आहेत. भाजपने यातील काही नेत्यांशी चर्चा केली. काहींनी होकार तर काहींनी नकारही दिला आहे.

नव्या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गटाला ८ जागा?
या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसात बैठक होणार आहे. सध्याच्या हालचाली पाहता शिंदे गटाला आठ जागा मिळण्याची शक्यता आहे, उर्वरित जागा भाजप आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.

नेत्यांचे पुनर्वसन करणार
शब्द दिल्याने तुमच्याबरोबर आल्याची आठवण शिंदे गटाचे अनेक खासदार करून देत आहेत. पण त्यांना उमेदवारी देणे धोकादायक वाटत असल्याने सध्या पुनवर्सन करण्याचा नवा शब्द दिला जात आहे. त्यामध्ये तातडीने राज्यसभा अथवा जूनमध्ये विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR