29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रइंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन

इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता मुंबईत होणार आहे. यानिमित्त मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मुंबई काँग्रेसतर्फे सुरू करण्यात आली असून, यानिमित्त १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथील मैदानात सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्य सरकारने या सभेला परवानगी दिली. या सभेसाठी ‘इंडिया’ आघाडीतील इतरही नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार असून, यानिमित्त महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी दक्षिणोत्तर भारत जोडो यात्रा पूर्ण केल्यानंतर मणिपूर ते मुंबई अशी पूर्व-पश्चिम भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली. या यात्रेच्या समारोप सभेसाठी काँग्रेसने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली होती. त्यानुसार परवानगी दिली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ येत्या १६ मार्च रोजी ठाण्यात दाखल होणार आहे. त्यानंतर याचदिवशी ही यात्रा मुंबईच्या दिशेने कूच करणार असून, या यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. मुंबईत होणा-या सांगता सोहळ््यासाठी मुंबई काँग्रेसने रणशिंग फुंकले आहे. या यात्रेच्या तयारीसाठी मंगळवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील कार्यालयात विशेष बैठक बोलविली होती. या बैठकीत मुंबई काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिका-यांमध्ये रॅलीच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, लडाख, काश्मीर या राज्यातून यात्रा पूर्ण केली होती. या यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर राहुल गांधी यांनी मणिपूरमधील भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली. या यात्रेत अनेक ठिकाणी पोलिस परवानगी आणि इतर कारणांमुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यातच बिहारमधील पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या सभेला मोठा प्रतिसाद होता. त्याच पद्धतीने ही यात्रा नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे तर या यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.

कामाला लागण्याचे आदेश
शिवाजी पार्क येथे ही रॅली व्हावी, यासाठी मुंबई काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता राहुल गांधी यांच्या रॅलीला मुंबईतील सभेसाठी शिवाजी पार्क मैदान देण्यात येईल, ही शक्यता तशी धूसर असल्याने मुंबई काँग्रेसने बीकेसी मैदानाची चाचपणी पूर्ण केली असल्याचे मुंबई काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. या बैठकीत रॅलीच्या आयोजनाकरिता विविध जबाबदा-या निश्चित करण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR