22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेसाठी शिंदे गट ‘कमळा’वर लढविणार निवडणूक?

लोकसभेसाठी शिंदे गट ‘कमळा’वर लढविणार निवडणूक?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. आपापल्या मतदारसंघात हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर जागावाटपासंबंधी बैठका, चर्चा होणार असल्याचे संकेत अनेकदा नेत्यांनी बोलताना दिले आहेत. मात्र, त्याआधीच शिवसेना शिंदे गटातील काही खासदारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. ५ पैकी ३ राज्यांमध्ये भाजपने बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. हीच बाब लक्षात घेता शिंदे गटातील खासदारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्ह अधिक प्रभावी ठरेल, असे शिवसेना (शिंदे गटातील) काही खासदारांचे मत आहे. त्यामुळे आम्हाला कमळ चिन्हावरच निवडणूक लढू द्या, अशी विनंती त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.
तर शिवसेना (शिंदे गटाच्या) खासदारांची ही मागणी भाजपला मान्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याउलट शिंदे गटातील खासदारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवली तर त्याचा ठाकरे गटाला जास्त फायदा होईल, असे भाजपचे मत आहे. त्यामुळे भाजपने शिंदे गटाच्या या मागणीला नकार दिल्याची माहिती आहे.

कमळाबाईचे गुलाम : संजय राऊत
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गट कमळाबाईच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे, शिंदे गट खोके सरकार असून त्यांना स्वत:चे अस्तित्व नाही. ते कमळाबाईचे गुलाम असल्याने कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
धनुष्यबाणावर लढणार : संजय शिरसाट म्हणाले
शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहेत. शिंदे गट कमळावर निवडणूक लढणार ही बातमी खोटी आहे. ही बातमी पेपरमध्ये संजय राऊत यांनीच पेरली. शिवसेनेचे सर्व खासदार धन्युष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत. यावर कुणीही शंका घेऊ नये, असे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

उदय सामंतांचे प्रत्युत्तर
मंत्री उदय सामंत यांनीही राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे उमेदवार कमळावर लोकसभा लढणार या अफवा पसरवल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने चिन्ह आम्हाला दिलेय. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावरच शिवसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुका लढणार आहोत.

शेवाळे यांचा पलटवार
शिंदे गटाचे नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
आम्ही १३ खासदार बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत. सर्व खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. काहीजण अफवा पसरवत आहेत. परंतु शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची यापूर्वी चर्चा झाली आहे, असे राहुल शेवाळे म्हणाले.

भाजपची प्रतिक्रिया
तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. कमळावर निवडणूक लढवण्याबाबत मला कल्पना नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते याबद्दल निर्णय घेतील. पण अद्याप असे काही काही ठरले नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR