Homeमहाराष्ट्रबच्चू कडूंच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण

बच्चू कडूंच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण

मुंबई : प्रतिनिधी
शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहोत, अशी घोषण प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. आमचे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडू शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

बच्चू कडू म्हणाले, आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी हाती घेणार आहोत. कालपरवा ज्या चर्चा झाल्या, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घ्यावी, हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले, मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे.

कोणताही समझोता नाही
शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. पण त्याबदल्यात आम्हाला शेतक-याची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्याबद्दल कुठलीही तडजोड होणार नाही, असेही बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल? त्यासाठी माझ्या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे, तितकाच माझ्या मजूर, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी धावणार आहे. त्यांच्यासाठी कोणताही समझोता होऊ शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

पुन्हा एकदा ‘घरवापसी’
आम्ही आमच्या राजकीय प्रवासाची शिवसेनेतून सुरुवात केली होती. माझ्याकडे अजूनही बाळासाहेब ठाकरेंना शेतकरी कर्जमाफी संदर्भात लिहिलेले पत्र आहे. कापसाच्या भावासंदर्भात आम्ही राजीनामा दिला होता. आता पुन्हा शेतक-यांचे आणि दिव्यांगांचे मुद्दे घेऊन आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहोत. हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी, मजूर, वंचित घटकांच्या, दिव्यांगांसाठी कसा कामी येईल? तो उचलण्याचा प्रयत्न करू, असे बच्चू कडू म्हणाले.

मला मंत्रिपद हवे असते तर..
बच्चू कडू म्हणाले की, मला मंत्रिपदाचे काही नाही, मला काही मागायची सवय नाही, मला मंत्रिपद हवे असते तर गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हाच मागितले असते. लोक मंत्रिपदासाठी फिंल्डिंग लावत होती, पण मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो. बच्चू कडू म्हणाले, आता जे घडते आहे ते माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते, मला काहीच माहिती नव्हती, मी संत्र्याला पाणी देत होतो, तुमच्या बातम्या आल्या, सूत्रांनी सांगितले. फोन केला. इथपर्यंत मी येण्याचे श्रेय मी माध्यमांना देतो, विधान परिषद माझ्या कानावर देखील नव्हती, हे कानावर टाकण्याचे काम माध्यमांनी केले.

सामाजिक काम करणा-यांसाठी प्रहार राहील
बच्चू कडू म्हणाले की, २४ तासांत एकनाथ शिंदेंसोबत शेतक-यांच्या हमीभावावर चर्चा झाली, पेरणीपासून ते कापणीपर्यंतची चर्चा झाली, दिव्यांगांच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, ते होत असेल तर काय? संघटना या काळात चालवणे फार कठीण आहे, कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणे माझे काम आहे. जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा. प्रहार संघटना राहील, ज्याला सामाजिक काम करायचे आहे, त्यासाठी प्रहार राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR