18 C
Latur
Saturday, November 22, 2025
Homeमनोरंजनआगीत शिव ठाकरेंच्या ट्रॉफीही जळाल्या

आगीत शिव ठाकरेंच्या ट्रॉफीही जळाल्या

मुंबई : बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घरी दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत लिव्हिंग रुम जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे अधिकारी त्याच्या घरी दाखल झाले तेव्हाची काय परिस्थिती होती याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिव ठाकरे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला. मात्र त्याचे बरेच नुकसान झाले. दोन वर्षांपूर्वीच त्याचे मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण झाले होते मात्र आज त्याच्यावर ही परिस्थिती ओढवली. आता नुकतेच त्याने या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

शिव ठाकरेच्या घरी आग लागली आणि बातमी वा-यासारखी पसरली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे शिवने नंतर सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत सांगितले. आता त्याने व्हिरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण घटना सांगितली. तो म्हणाला आग लागली तेव्हा मी घरातच होतो. सकाळी ही दुर्घटना घडली. मी तेव्हा झोपलो होतो. अख्खे घर जळत होते आणि मला काहीच कळाले नाही. कारण बाहेरुन काहीच आवाज येत नव्हते.

ना सायरनचा आवाज ना अजून काही. आम्ही मोठमोठ्या इमारतीत राहतो ते फक्त नावालाच असते. देवाच्या कृपेनेच आज मी इथे आहे. माझ्या घरी काम करणारी देव बनूनच आली. तिने दार ठोठावले. मी बाहेर येऊन पाहिले तर रात्रीसारखा अंधार झाला होता असे समजा की देवाच्या कृपेनेच मी वाचलो.

तो पुढे म्हणाला नुकसान तर झालं..पण काय करणार पुन्हा कमवता येईल. देव सोबतच आहेच अजून काम करु आणि कमवू. २ सेकंदासाठी वाईट वाटते की अरे या गोष्टी खूप मेहनतीने कमावल्या आहेत. सर्वात जास्त वाईट वाटते जेव्हा ट्रॉफी जळाल्या. मला वाटते बाकी पैसे तर मी कमवेन पण ट्रॉफी आणि अशा गोष्टी आहेत ज्या मला मिळाल्या, जी शाबासकी आहे ती जळताना पाहून मला जास्त दु:ख झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR