सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली. यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौदलाच्या ध्वजाला मागच्या वर्षी शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडण्यात आले, हे माझे भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौ-यावर आले होते. आज नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याचे अनावरण केले. तारकर्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की, कोणत्याही देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे.
थरारक प्रात्याक्षिके
दरम्यान, नौदल दिनानिमित्त येथे नौदलाच्या वतीने येथे हवाई प्रात्याक्षिकही सादर करण्यात आली. यावेळी विमानांची थरारक उड्डाणे मोदींच्या उपस्थितीत पाहता आली. या थरारक उड्डाणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी हवाई दलाचेही कौतुक करण्यात आले.
आता सशस्त्र दलात नारीशक्ती वाढविणार
सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. नौसेनेचे अभिनंदन करतो की, नेव्हलशीपमध्ये देशातल्या पहिल्या महिला कमांडर ऑफिसरची नियुक्ती केली आहे. शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना बोट बनवण्याची कला पुन्हा विकसित करणे गरजेचे असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.
विकासकामांची घोषणा
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ आता सुरू झाले आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर माझगावपर्यंत जोडणार आहे. इथल्या काजू उत्पादक शेतक-यांसाठीही विशेष योजना बनवण्यात येत आहेत. समुद्रकिना-यावरील रहिवासी भागांना वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे. यासाठी मँग्रुव्हजचा भाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने यासाठी विशेष मिश्टी योजना बनविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
गॅरन्टीचे दुसरे नाव नरेंद्र मोदी : शिंदे
गॅरन्टीचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पूर्वी घर घर मोदी, असे म्हटले जात होते. आता मन मन मोदी म्हटले जात आहे. तीन राज्यांमध्ये मोदींचा करिष्मा दिसल्याने भाजपला सत्ता मिळाल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले.
देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी
पंतप्रधानांचे मोठे काम : राणे
केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी नौदलाची निर्मिती करून दूरदृष्टी दाखवून दिली होती. आजही आपला देश त्यांच्याच विचारांवर चालत आहे. मोदींनी देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठेकाम उभे केल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.