वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका इराणसोबत करार करण्याच्या घाईत नाही. पुढील आठवड्यात अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध होऊ शकते का? हे सांगण्यासही त्यांनी नकार दिला. मी हल्ला करणार असेन किंवा सेन मी सर्वांना का सांगू, मी सर्वांना सांगून हल्ला करणार आहे का? असा सवाल करत त्यांनी इराणवरील हल्ल्याबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे. फ्लोरिडातील पाम बीच येथील त्यांच्या मार-ए-लागो क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे संकेत दिले आहेत की ते इराणसोबत कोणताही करार करण्याची घाई करणार नाहीत. ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या नौदल, हवाई दल आणि हवाई संरक्षण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की, इराणची जवळपास सर्व प्रमुख लष्करी उपकरणे आणि अनेक उत्पादन केंद्रे नष्ट झाली आहेत. अणुऊर्जा केंद्रांनाही लक्ष्य करण्यात आले होते. ट्रम्प म्हणाले, आम्ही करार करण्यासाठी घाई करत नाही. आम्ही त्यांचे नौदल आणि हवाई दल आधीच नष्ट केले आहे. आम्हाला अजून एक-दोन तळ नष्ट आहेत आणि ते आम्ही फक्त १० मिनिटांत करू शकतो.
पुढच्या आठवड्यात अमेरिका इराणसोबत युद्ध सुरू करू शकते का, असे पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देण्यास नकार दिला. ट्रम्प म्हणाले, समजा मी तसे करणार असेन, तर मी तुम्हाला सांगेन का? आणि जर मी तसे करणार नसेन, तर मी तुम्हाला ते सांगेन का? मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, असे सांगत त्यांनी सस्पेन्स वाढवला. ट्रम्प यांनी असाही दावा केला की इराणला करार करायचा आहे, पण त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. ते म्हणाले की इराण आधी करार करतो आणि नंतर त्यातून माघार घेतो. इराणचे सर्वोच्च नेते, मोजतबा खोमेनेई यांनी देशाच्या सशस्त्र दलांना कोणत्याही धोक्याला तात्काळ प्रत्युत्तर देण्याचा आदेश दिल्यानंतर काही तासांनी ट्रम्प यांचे हे विधान आले. खोमेनेई यांनी अमेरिकन आणि इस्रायली लक्ष्यांवर हल्ला करण्याचे आदेशही दिले.
















