मुंबई : प्रतिनिधी
इंग्लंड दौ-यासाठी भारतीय कसोटी संघाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज दि. २४ मे रोजी घोषणा केली. युवा फलंदाज शुभम गिल याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली तर उपकर्णधारपदी ऋषभ पंतची निवड झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या सकोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या जोमाने २० जूनपासून सुरू होणा-या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला भिडणार आहे.
बीसीसीआयने कर्णधार म्हणून शुभमन गिल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत २५ वर्षीय शुभमन गिल याचे नाव आघाडीवर होते. मागील ऑस्ट्रेलिया दौ-यात जसप्रीत बुमराह उपकर्णधार होता आणि तो एक नैसर्गिक दावेदार असल्याचे मानले जात होते. तसेच के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांच्याही नावाची चर्चा होती.
विराट कोहलीने निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाची मधली फळीही अनुभवहीन झाली आहे. आता विराट कोहलीची जागा घेण्यासाठी निवडकर्त्याचे लक्ष साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, करुण नायर यांच्यावर असल्याची चर्चा होती. अखेर करुण नायरला पुन्हा कसोटी संघात संधी देण्यात आली.
गिल ३५ वा कर्णधार
बीसीसीआयने २५ वर्षीय शुभमन गिल याला इंग्लंड दौ-यासाठी भारतीय कसोटी संघाचा ३५ वा कर्णधार म्हणून निवडले आणि ऋषभ पंतसारख्या अनुभवी आणि यशस्वी खेळाडूला उपकर्णधारपद दिले. खरे तर कर्णधारपदाचा खरा दावेदार बुमराह होता. परंतु त्याचा दुखापतीचा इतिहास पाहता त्याला यावेळी कर्णधारपद देणे टाळल्याचे समजते.
भारताचा इंग्लंड दौरा
भारतविरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना २० जून रोजी हेडिंग्ले, लीडस् येथे होणार आहे. यानंतर दोन्ही संघ २ जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे आमने-सामने असतील. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणा-या लॉर्डस् मैदानावर मालिकेतील तिसरी कसोटी खेळली जाईल तर २३ जुलैला ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे तर ३१ जुलैपासून केंिनंग्टन ओव्हल येथे अनुक्रमे चौथी आणि पाचवी कसोटी होणार आहे.
भारतीय कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव ज्युरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहमद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव….