सोलापूर (प्रतिनिधी): येथील नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी सिद्धाराम जवाहर कोटनूर यांची देशातील अग्रगण्य संस्था असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास येथे पदव्युत्तर एम.टेक. (रोबोटिक्स) या आधुनिक अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. सिद्धाराम यांनी गेट-२०२६ च्या यांत्रिकी अभियांत्रिकी परीक्षेत ६५२ गुण मिळवून अखिल भारतीय क्रमवारीत ६२५ वा क्रमांक प्राप्त केला आहे. देशभरातील ५९ हजारांहून अधिक उमेदवारांमधून त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आव्हानात्मक कौटुंबिक परिस्थितीतही त्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवत हे यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, स्पर्धा परीक्षांसाठीचे विशेष प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सराव यांचा सिद्धाराम यांच्या यशात मोलाचा वाटा राहिला. करिअर कौन्सिलिंग सेलचे समन्वयक प्रा. दीपक भोगे यांनी त्यांना गेट परीक्षेची तयारी, उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअर नियोजनाबाबत वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. ऑर्किड महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा गुणवत्तापूर्ण असून, यावर्षी गेट-२०२६ परीक्षेत महाविद्यालयातील एकूण १२ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत पात्रता मिळवली आहे. हा निकाल संस्थेच्या उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणाचा प्रत्यय देणारा ठरला आहे.
सिद्धाराम यांच्या या मोठ्या निवडीबद्दल यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य (करिअर डेव्हलपमेंट) डॉ. श्रीनिवास एस. मेतन, उपप्राचार्य (ॲकॅडमिक ॲण्ड ॲडमिन्स्ट्रेशन) डॉ. व्ही. के. पत्की, प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे तसेच महाविद्यालयाच्या विश्वस्तांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. रोबोटिक्ससारख्या आधुनिक आणि आव्हानात्मक शाखेसाठी आयआयटी मद्रासमध्ये निवड झाल्याने सिद्धाराम यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना सिद्धाराम कोटनूर यांनी सांगितले की, मी माझ्या यशाचे श्रेय माझे पालक, प्राध्यापक आणि ऑर्किड महाविद्यालयातून मिळालेल्या भक्कम तांत्रिक ज्ञानाला देतो. महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्समधील मायनर डिग्री कार्यक्रमामुळे मला बहुविद्याशाखीय शिक्षणाची संधी मिळाली. तसेच प्रोजेक्ट गाईड डॉ. श्रीनिवास एस. मेतन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उद्योग-प्रायोजित सोलर सेगवे प्रकल्पातून मेकॅट्रॉनिक्स आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या अनुभवांमुळे तांत्रिक कौशल्यांचा विकास होऊन मला डेसॉल्ट सिस्टिम्स सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. या सर्व गोष्टींचा गेट परीक्षेच्या तयारीत आणि पुढील शैक्षणिक वाटचालीत मोठा लाभ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
















