सोलापूर : मंद्रुपसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या सीतामाई तलावाचे पुनर्निर्माण करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. मात्र, हे काम करीत असताना एका चुकीमुळे बांध फुटून पाच तासात लाखो लीटर पाणी वाया गेले आहे. ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाणी वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सीतामाई तलावाचे आयुष्यमान संपले आहे. त्यामुळे या तलावाचे नव्याने बांधकाम करून त्याचे पुनर्निर्माण केले जात आहे. नव्याने नऊ मीटरपर्यंत बांध घालून त्याचे मुरमीकरण आणि दगडी पिचिंग करण्यात येणार आहे. हे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र, हे करीत असताना अचानक जुना बांधाच्या खालील पाइप काढण्यात आले आणि त्यातून लाखो लीटर पाणी वाहून गेले आहे. तलावातील पाणी मंद्रप-निंबर्गी रस्त्यावर आणि शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात घुसले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नंतर ठेकेदाराने तो बांध मातीने बुजविला. या प्रकारामुळे मात्र लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.
ही बाब धक्कादायक आहे. जर काम करताना योग्य तीखबरदारी घेतली असती तर हा प्रकार टाळता आला असता. खरेतर तलावाचे पुनर्निर्माण करताना अगोदर तलावाच्या मध्यभागी काळी माती भरून घेऊन मजबुतीकरण करणे गरजेचे होते. त्यानंतर मुरमीकरण आणि दगडी पिचिंगचे काम करावे लागते. याची कल्पना आपण त्यांना दिली होती. कंत्राटदाराने आणि अधिकाऱ्यांनी या तांत्रिक गोष्टीकडे दुर्लक्ष केले. खालचे पाइप काढणे आवश्यक नव्हते. तलावाचे पुनर्निर्माण करताना ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत ते पाळणे गरजेचे आहे. जर तांत्रिक गोष्टी पाळून काम केले असते तर आज पाणी वाया गेले नसते. या पुढील काळात काम करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.असे माजी सभापती आप्पाराव कोरे यांनी सांगीतले.
सध्या तलावाचे पुनर्निर्माणचे काम सुरू आहे. हे काम करीत असताना एका जुन्या बांधावर खाली पाइप होते. ते पाइप काढण्याशिवाय पुढे काम करणे अवघड होते. त्यामुळे ते पाइप काढले. जुने पाइप काढल्यामुळे पाणी तलावाच्या बाहेर आले. आम्ही काही वेळाने तो बांध पुन्हा बुजवला आहे, त्यामुळे आता पाणी स्थिर आहे.असे जलसंधारण अधिकारी बालाजी गालपल्ली यांनी सांगीतले.