मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रवास करत असलेल्या गाडीवर काल पुण्यात हल्ला झाला. या हल्ल्यातून वागळे थोडक्यात बचावले. पुण्यातील दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दलातील सभागृहात वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन केले होते. त्या सभेला जात असतानाच डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी फेसबुक पोस्ट शेअर करत वागळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो, अशा भावना निखिल वागळे यांनी व्यक्त केल्या आहेत. आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता.
दगड, लाठ्याकाठ्या, हॉकी स्टिक्स, रॉड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करून आम्हाला घेरण्यात आले. पोलिसांच्या संगनमताने हा हल्ला झाला, असा आरोपही वागळेंनी केला आहे.