नांदेड : प्रतिनिधी
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वसंतनगर, आनंदनगर परिसरामध्ये घरासमोर ठेवलेल्या जवळपास सहा वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी सकाळपासून सुरू झाली होती.
यापूर्वी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत हनुमान गड परिसरामध्ये अशाच प्रकारे वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार झाला होता यात दहा ते पंधरा वाहनांचे नुकसान झाले होते. तपास सुरू असताना याची पुनरावृत्ती पुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली.
शनिवारी रात्री उशिरापासून रविवारी पहाटेपर्यंत वसंतनगर व आनंदनगर भागात जवळपास सहा वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. वाहनांच्या काचा फोडण्याची टोळी शहरात सक्रिय झाल्याची चर्चा सुरू असून रविवारी सकाळपासून वाहनधारक तक्रार दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले होते. सदर घटनेचा तपास पोलिस करत असून वाहनांच्या काचा फोडणा-या टोळीला तात्काळ जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी दाखविला आहे.