मुंबई : आगामी काळात होणा-या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच महाविकास आघाडी व महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. उमेदवार जाहीर करताना सर्वच पक्षांनी आघाडी घेतली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहिल्या तीन याद्यांमध्ये ७६ उमेदवार जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये प्रथमच आतापर्यंत ११ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. त्यामध्ये नऊ उमेदवारांची घोषणा केली. या तिस-या यादीमध्ये परळीमधून राजेसाहेब देशमुख यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तिकिट देण्यात आले आहे.
मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद यांना तिकिट देण्यात आले आहे. या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत ११ महिला उमेदवारांना संधी दिली आहे. मुक्ताईनगर- रोहिणी खडसे, अहेरीमधून भाग्यश्री आत्राम, घाटकोपर पूर्व मतदारसंघातून राखी जाधव, पारनेर-राणी लंके, मोहोळ – सिद्धी रमेश कदम, पर्वतीमधून अश्विनी कदम, आर्वी -मयुरा काळे, बागलान दीपिका चव्हाण, दिंडोरी- सुनीता चारोस्कर, पिंपरी- सुलक्षणा शीलवंत, चंदगड- नंदिनी भाबुळकर कुपेकर यांचा समावेश आहे.
त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यादीत करंजा – ज्ञायक पटणी, हिंगणघाट – अतुल वांदिले, हिंगणा – रमेश बंग, अणुशक्तीनगर – फहाद अहमद, चिंचवड – राहुल कलाटे, भोसरी – अजित गव्हाणे, माजलगाव – मोहन बाजीराव जगताप, परळी – राजेसाहेब देशमुख, मोहोळ – सिद्धी रमेश कदम यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिल्या यादीत ४५, दुस-या यादीत २२ तर रविवारी जाहीर झालेल्या तिस-या यादीत ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ७६ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये ११ महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.