नांदेड : प्रतिनिधी
शहरातील शहीदपुरा भागात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरगुती वादातून जावयाने सासूवर खंजरने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. सदर घटना अबचलनगर परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बलजीत कौर कुलदीप सिंग सिद्धू(४९, रा. अबचलनगर) असे मृत सासूचे नाव आहे. गगनसिंग गणपतसिंग ऊर्फ लक्कीसिंग मीलवाले याने घरगुती वादातून सासू बलजीत कौर यांच्यावर खंजरने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. यावेळी आरोपीने त्याची पत्नी गुरुप्रीत कौर(३०) हिच्यावरही खंजरने वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी जावई गगनसिंग गणपतसिंग मीलवाले फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वेंजने, वजीराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत असून आरोपी जावयाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
















