मुंबई : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अरुंधती नायरच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेत्री व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वी अरुंधतीचा अपघात झाला होता.
या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्रिवेंद्रम येथील अनंतापूरी या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आल्याची माहिती अरुंधतीच्या बहिणीने दिली आहे.
१४ मार्चला अरुंधतीच्या दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. याबाबत तिच्या बहिणीने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तमिळनाडूतील वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेलद्वारे दिली गेलेली बातमी ही खरी आहे. माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला आहे, असे तिने म्हटले आहे. या पोस्टद्वारे अरुंधतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन तिच्या बहिणीने चाहत्यांना केले आहे.
या अपघातात ती गंभीर जखमी झाली असून तिला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तिच्यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे, असेही पुढे अरुंधतीच्या बहिणीने पोस्टमध्ये म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरुंधती अपघातावेळी तिच्या भावाबरोबर प्रवास करत होती. एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिल्यानंतर घरी येताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. तिच्या अपघाताच्या बातमीनंतर चाहते चिंतेत आहेत. तमिळ आणि मल्याळम सिनेमात काम करून अरुंधतीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.