गयाना : वृत्तसंस्था
फिरकी गोलंदाज केशव महाराजच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुस-या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिस-या दिवशी वेस्ट इंडिजचा ४० धावांनी पराभव करत दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजसमोर २६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र त्यांचा संघ २२२ धावांवर बाद झाला. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. आता वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याची ही सलग १० वी वेळ आहे. पहिल्या डावात दोन बळी घेणा-या केशव महाराजांनी दुस-या डावात ३७ धावांत तीन बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने ५० धावांत तीन बळी घेतले. वेस्ट इंडिजकडून नवव्या क्रमांकाचा फलंदाज गुडाकेश मोतीने सर्वाधिक ४५ धावा केल्या.
दरम्यान, केशव महाराजांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १७१ विकेट्स घेतल्या आहेत, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज बनला आहे. त्याने ू टेफिल्डला मागे सोडले आहे. केशवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या चालू मालिकेत १३ विकेट घेतल्या आहेत.