नांदेड : प्रतिनिधी
अधार्पूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकर फाटा परिसरात भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना २० जुलै रोजी सायंकाळी ६.२५ वाजता घडली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी (आरजे-१४-झेडके-५०४७ ) वरून प्रवास करणारे शाहेद खान जमील खान व शाहेद खान आयुब खान, दोघेही मूळ राजस्थान येथील असून सध्या अधार्पूर येथे वास्तव्यास आहेत. भोकर फाट्याकडे जात असताना कार (क्र.एमएच-४८-सीए-०६१७) ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या भीषण धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अधार्पूर पोलीस ठाण्याचे हवालदार फारुखी व पोलीस शिपाई शिनगारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालय, अर्धापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. फरार कारचालकाचा शोध सुरू आहे.
















